छाननीत २६ उमेदवारी अर्ज बाद
By Admin | Updated: February 3, 2017 01:13 IST2017-02-03T01:13:48+5:302017-02-03T01:13:48+5:30
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३५ जिल्हा परिषद व ७० पंचायत समिती गणात निवडणूक होऊ घातली आहे.

छाननीत २६ उमेदवारी अर्ज बाद
पक्षीय उमेदवारांनाही फटका : पहिल्या टप्प्यात जि.प.चे ९ तर पं.स.चे १७ नामांकन अवैध
गडचिरोली : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३५ जिल्हा परिषद व ७० पंचायत समिती गणात निवडणूक होऊ घातली आहे. गुरूवारी या क्षेत्रातील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया स्थानिक तहसील कार्यालयात पार पडली. आठ तालुक्यांतून जिल्हा परिषदकरिता असलेले ९ उमेदवारी अर्ज रद्द झाले आहे. तर पंचायत समितीकरिता १७ उमेदवारी अर्ज रद्द झाले आहेत, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. छाननीत गडचिरोलीत काँग्रेस तर मुलचेरात भाजपच्या उमेदवारांचा अर्ज रद्द झाला. याशिवाय चामोर्शी तालुक्यात भाकप उमेदवाराचेही अर्ज रद्द झाले.
गडचिरोलीत काँग्रेस उमेदवाराचा अर्ज कटला
छाननी प्रक्रियेदरम्यान गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या हेमलता स्वामी डोंगरे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्यांनी अर्जामध्ये दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडून साक्षांकीकरण करून घेतलेले नव्हते. तर नायब तहसीलदारांकडून ते केले असल्याने तांत्रिक बाबीवर त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.
गडचिरोली येथे रासपकडून भरलेल्या बंडोपंत मल्लेलवार यांच्या अर्जावर पक्षानेच आक्षेप घेतला
चामोर्शीत सहा अर्ज रद्द
चामोर्शी तालुक्यात एकूण ४७ उमेदवारांचे अर्ज छाननीत स्वीकृत करण्यात आले आहेत. दोन जिल्हा परिषद क्षेत्रातील उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. हळदवाही-रेगडी जि.प. क्षेत्रातून भाकपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणारे पुंगाटी मंचू बुचय्या यांचा उमेदवारी अर्ज शपथपत्र अभिसाक्षांकीत नसल्याने रद्द करण्यात आला आहे. तर आष्टी-इल्लूर जिल्हा परिषद क्षेत्रातून बीआरएसपीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणारे कुकडकर मोहना प्रकाश यांचाही अर्ज याच कारणासाठी अवैध ठरविण्यात आला आहे. तर पंचायत समितीसाठी ७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ७५ अर्ज वैध ठरले आहेत. चार उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. यात कुरूळ क्षेत्रातून काँग्रेसच्या सोमनकर रेखा सुरेंद्र यांनी अर्जासोबत शपथपत्र दुसऱ्याचे जोडल्याने त्यांचा अर्ज रद्द झाला. तर हळदवाही क्षेत्रातून भाकपच्या नरोटे लिलाबाई मानू यांनी शपथपत्र सर्टीफाईट (सांक्षाकित केलेले नसल्याने) त्यांचा अर्ज अवैध ठरला. रेगडी क्षेत्रातूनही भाकपचे वैरागडे संगीता रूपेश यांचाही अर्ज याच कारणासाठी रद्द करण्यात आला तर आष्टी पं. स. गणातील अपक्ष उमेदवार इजमनकर उमाजी जानकीराम यांनीही अभिसाक्षांकित केलेले नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. पं.स.साठी चार अर्ज अवैध झाले आहे.
धानोरात सहा अर्ज बाद
धानोरा तालुक्यात पंचायत समितीसाठी ४२ व जिल्हा परिषदेसाठी २६ नामांकन अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये पंचायत समितीचे सहा नामांकन बाद झाले आहेत. यामध्ये पेंढरी पं.स. गणातून काँग्रेसच्या उमेदवार पवार रोशनी स्वप्नील, मुरूमगाव पं.स. गणातून अपक्ष उमेदवार गणपत कोल्हे, मुस्का गणातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज भरलेले आचला देवाजी, येरकड पं.स. गणाच्या शिवसेनेच्या उमेदवार मंगला उईके, कारवाफा पं.स. गणातून अपक्ष उमेदवार परसे चंद्रकला दुधराम व गट्टा पं.स. गणातून अपक्ष उमेदवार मडावी प्रेमिला केशव यांचे नामांकन रद्द झाले आहे. जिल्हा परिषद क्षेत्रातून मात्र कोणाचेही नामांकन रद्द झाले नाही.
कोरचीत तीन अर्ज बाद
कोरची तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन क्षेत्रात व पंचायत समितीच्या एका गणात तीन उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत गुरूवारी रद्द करण्यात आले. कोरची तालुक्यात कोटरा-बिहिटेकला व बेडगाव-कोटगूल हे जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. बेडगाव-कोटगूल क्षेत्रात शिवसेनेचे उमेदवार वनिता विजय घुग्गुसकर व अपक्ष हेमलता विठ्ठल शेंडे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. वनिता विजय घुग्गुसकर यांना २००२ नंतर चार अपत्य असल्याचा आक्षेप भाजपच्या वतीने घेण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला तर हेमंताबाई शेंडे यांनी अपत्या संबंधीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडले नसल्याने त्यांचाही अर्ज रद्द करण्यात आला आहे. तर बिहिटेकला पं.स. गणातून बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणारे घाटघुमर मेहतरू थनूराम यांनी त्या गणातील सूचक आपल्या अर्जावर न घेता कोरची नगर पंचायतीच्या क्षेत्रातील सूचक घेतल्यामुळे त्यांचाही उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण तीन उमेदवारी अर्ज छाननीत रद्द झाले आहेत.
कुरखेडात दोन अर्ज बाद
कुरखेडा तालुक्यात पं.स. गणाकरिता ५० नामांकन जि.प. क्षेत्राकरिता २७ नामांकन दाखल केले होते. छाननी दरम्यान पुराडा पं.स. गणातून अपक्ष उमेदवार मरकाम राजेंद्रसिंह श्यामसुंदरसिंह यांनी जातीचा दाखला न जोडल्याने अर्ज रद्द करण्यात आला तर बोरकर लहरीदास नामदेव यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा पोचपावती सादर न केल्याने त्यांचे नामांकन रद्द झाले आहेत.
आरमोरीत जि.प.चे तीन तर पं.स. दोन अर्ज अवैध
आरमोरी तालुक्यात ठाणेगाव-इंजेवारी जिल्हा परिषद क्षेत्रातून प्रिती किसनराव शंभरकर यांनी भारतीय जनता पक्षाकडून भरलेला उमेदवारी अर्ज एबी फार्म न जोडल्याने रद्द झाला आहे. मात्र त्यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले दोन नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आले आहे. याच क्षेत्रातून वारके रेखा सुरज यांनी काँग्रेस व अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचा एबी फार्म न जोडल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आलेला आहे. मात्र अपक्ष म्हणून भरलेला अर्ज कायम आहे. तसेच याच क्षेत्रातून महाजन रत्नमाला तुळशीराम यांनी शिवसेनेचा भरलेला उमेदवारी अर्ज एबी फार्म न जोडल्याने रद्द झाला आहे. त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम आहे. अरसोडा पं. स. गणातून कांदोर विवास श्रीराज यांनी शिवसेनेकडून भरलेला अर्ज एबी फार्म न जोडल्यामुळे अवैध ठरविण्यात आला आहे. वडधा पं.स. गणातून बसपाचे गोलू अनिल भोयर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज नामनिर्देशन पत्रासोबत शपथपत्र न जोडल्याने अवैध ठरविण्यात आला आहे.
देसाईगंज येथे एकही उमेदवारी अर्ज अवैध ठरला नसल्याची माहिती स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली.
मुलचेरात जि.प.चा एक तर पं.स.चे दोन अर्ज अवैध
मुलचेरा तालुक्यातील ३ जिल्हा परिषद गटासाठी १८ नामनिर्देशन व पंचायत समितीसाठी २६ नामनिर्देशन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. गुरूवारी उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी पार पडली असून जिल्हा परिषदचे १ तर पंचायत समितीच्या २ उमेदवारांचे नामनिर्देशन ठरले अवैध आहेत. या छाननीला सर्व उमेदवार उपस्थित होते.
सुरुवातीला जिल्हा परिषदच्या तिन्ही गटाची छाननी करण्यात आली. त्यामध्ये सुंदरनगर -गोमणी या गटातून शिवसेनेचे उमेदवार अमूल म्रिदुल घोष यांच्या नामनिर्देशन पत्रात सूचकाने स्वाक्षरी न केल्याने त्यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले. उर्वरित दोन गटात ज्या उमेदवारांनी दोन-दोन अर्ज सादर केला होते त्यांचे एक नामनिर्देशन पत्र वैध घोषित करण्यात आले. त्यानंतर तालुक्यातील ६ पंचायत समिती गणातील नामनिर्देशन पत्र तपासणीला सुरुवात झाली सुंदरनगर गणातून भाजपच्या उमेदवार लक्ष्मीकांता कार्तिक गरतुलवार यांच्या नामनिर्देशन पत्रात सूचक म्हणून गजानन येलमूलवार यांचे नाव होते. मात्र ते गोमणी गणातील रहिवासी असल्याने लक्ष्मीकांता गरतुलवार यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे निवडणूक अधिनियम १९६१ अंतर्गत नियम १९६२ कलम १६ उपकलम-२ अन्वये त्यांचा नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आला आहे.
कोठारी गणातून गौरी तुळशीराम कडते या उमेदवाराचे सूचक सुलोचना सुरेश कडते सुद्धा सुंदरनगर मतदार संघातील असल्यामुळे त्यांचा नामनिर्देशन पत्र अवैध घोषित करण्यात आला आहे. उमेदवार तालुक्यातील कुठलेही असले तरी ज्या गणातून उभे राहणार आहेत. त्या गणातील सूचक असणे बंधनकारक आहे अन्यथा त्या गणातील एकही मतदार उमेदवारांच्या बाजूने नसल्याचे समजून त्या उमेदवारांचा नामनिर्देशन अवैध ठरवला जातो . सर्व उमेदवारांचे मुळ कागदपत्रे सुद्धा तपासण्यात आले व अवैध ठरले ल्या उमेदवारांना न्यायालयात दाद मागण्याची मुद्दत सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी विजय मुळीक यांनी समजावून सांगितली.