आमदारांच्या विनंतीनंतर तलाठ्यांचे आंदोलन मागे
By Admin | Updated: June 14, 2016 01:01 IST2016-06-14T01:01:20+5:302016-06-14T01:01:20+5:30
आमदार देवराव होळी यांनी तलाठ्याला अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप करीत या प्रकरणी आमदारांवर

आमदारांच्या विनंतीनंतर तलाठ्यांचे आंदोलन मागे
गडचिरोली : आमदार देवराव होळी यांनी तलाठ्याला अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप करीत या प्रकरणी आमदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाभरातील तलाठ्यांनी ६ जूनपासून आंदोलनाला सुरूवात केली होती. दरम्यान, आ. होळी यांनी १३ जून रोजी दुपारी ४ वाजता गडचिरोली येथील तलाठ्यांच्या आंदोलन स्थळाला भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर तलाठ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्याचबरोबर एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीसुध्दा मागे घेतल्या.
कठाणी नदीवरील रेती घाटावरून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांविरोधात उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या नेतृत्वात तलाठ्यांनी कारवाई केली होती. याचदरम्यान आमदार डॉ. देवराव होळी हे सुध्दा त्या ठिकाणी पोहोचले होते. आमदार व तलाठी यांच्यामध्ये बाचाबाची होऊन त्यांनी एकमेकांविरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. जिल्हाभरातील तलाठ्यांनी ६ जूनपासून लेखणी बंद आंदोलन व १० जूनपासून धरणे आंदोलन सुरू केले होते.
दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. शेतीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध दाखले तलाठ्यांकडून मागावे लागतात. अशातच तलाठ्यांनी आंदोलन सुरू केल्याने सामान्य जनतेच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथील मंडळ अधिकारी कार्यालयासमोरील तलाठ्यांच्या धरणे आंदोलनाला सोमवारी भेट दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना आपल्या दोघांच्या भांडणामुळे जनतेचे हाल होत आहेत. हे योग्य नसून विकासाला मारक ठरणारे आहे. त्यामुळे तलाठ्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. त्यानंतर तलाठ्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. तक्रारकर्ते तलाठी अजय तुंकलवार व आमदार डॉ. देवराव होळी या दोघांनीही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एकमेकांच्याविरोधातील तक्रारी मागे घेतल्या.
आंदोलन स्थळाला आमदारांनी भेट दिली. यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अनिल पोहोणकर, विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष के. पी. ठाकरे, उपाध्यक्ष पी. टी. तुलावी, सहसचिव व्ही. व्ही. बोंडे, एन. जी. वाते, मंडळ अधिकारी प्रकाश डांगे, बी. ए. बांबोळे, विलास बारसागडे, महेश गेडाम, अजय तुंकलवार, गणेश खांडरे यांच्यासह तालुक्यातील तलाठी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
तलाठ्यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी मध्यस्ती केली होती. राज्यात आपलेच सरकार आहे. आंदोलनामुळे सामान्य जनतेचे हाल होऊ नयेत, ही बाब लक्षात घेऊन आपण प्रत्यक्ष आंदोलनस्थळाला भेट दिली व तलाठ्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.
- डॉ. देवराव होळी,
आमदार गडचिरोली