पावसानंतरही दुष्काळ कायम

By Admin | Updated: September 11, 2014 23:32 IST2014-09-11T23:32:31+5:302014-09-11T23:32:31+5:30

मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग काही प्रमाणात सुखावला असला तरी, महिनाभर पाऊस न पडल्याने धानपिकाचे झालेले नुकसान भरून निघणे शक्य नसल्याने

After drought, there is a drought | पावसानंतरही दुष्काळ कायम

पावसानंतरही दुष्काळ कायम

गडचिरोली : मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग काही प्रमाणात सुखावला असला तरी, महिनाभर पाऊस न पडल्याने धानपिकाचे झालेले नुकसान भरून निघणे शक्य नसल्याने पावसानंतरही जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती कायम आहे, असे भारतीय किसान संघाने म्हटले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात हलका मध्यम व जड या तीन प्रतिच्या धानाची लागवड करण्यात येते. हलका धान ११० ते १२० दिवसांत निघतो, मध्यम कालावधीचा धान १३० ते १४० दिवसांत निघतो तर जड धान १४५ ते १६० दिवसांत कापणीसाठी तयार होतो. जिल्ह्यात हलक्या व मध्यम प्रतिच्या धानाच्या सर्वाधिक लागवड करण्यात येते. सदर धान लवकर निघत असल्याने याची रोवणीसुद्धा लवकर होणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने या हलक्या व मध्यम धानाच्या रोवण्याचा कालावधी निघुन गेल्यानंतर रोवणी झाली आहे. हीच बाब काही प्रमाणात जड धानालाही लागू होते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात जरी पाऊस पडला असला तरी, धानपिकाचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कृषी विभागाच्या प्रयत्नानंतर जिल्ह्यात श्री पद्धतीने धानपिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत चालले आहे. श्री पद्धतीने धानाच्या रोपट्यांची लागवड १२ दिवसांच्या आतच करावी लागते. मात्र पऱ्हे टाकून २ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. नुकत्याच झालेल्या पावसानंतर धानाची रोवणी काही शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात जवळपास ५० हजार हेक्टरवर आवत्या पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात येते. आवत्यालाही एक महिन्याच्या आत बासी होणे आवश्यक आहे. मात्र पाऊसच नसल्याने बासी होऊ शकली नाही. त्यामुळे खत देणे किंवा धानपिकातील गवत काढण्याचे काम झाले नाही. त्यामुळेही धानपिकाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. रस्त्याने फेरफटका मारून दुष्काळाच्या परिस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व ‘आॅल ईज वेल’ असल्याचे दिसून येईल. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती याहून भिन्न आहे. उशिरा धानाची रोवणी झाली असल्याने धानपीक उशिरा निघणार आहे. तोपर्यंत तलाव, बोड्यांचे पाणी संपून कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उशिरा रोवणी झालेल्या पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना आगावू खर्च करावा लागणार आहे. या सर्व बाबींचा अंदाज घेतल्यास दुष्काळाचे सावट कायम असल्याने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भारतीय किसान संघाचे जिल्हामंत्री राजेश वाणी, अ‍ॅड. विलास भृगुवार, प्रेमानंद सोनटक्के, यादव भैसारे, उदय बोरावार यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: After drought, there is a drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.