एका शिशुच्या मृत्यूनंतर दुसऱ्याला नागपुरात हलविले
By Admin | Updated: December 27, 2014 01:39 IST2014-12-27T01:39:29+5:302014-12-27T01:39:29+5:30
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावातील एका महिलेला दोन जुळे अपत्य झालेत. मात्र आरोग्य यंत्रणेकडून या महिलेला वेळीच सुविधा उपलब्ध न झाल्याने ..

एका शिशुच्या मृत्यूनंतर दुसऱ्याला नागपुरात हलविले
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावातील एका महिलेला दोन जुळे अपत्य झालेत. मात्र आरोग्य यंत्रणेकडून या महिलेला वेळीच सुविधा उपलब्ध न झाल्याने तीच्या एका नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी घडली. त्यानंतर गडचिरोली जिल्हा रूग्णालयातून या महिलेसह तिच्या एका शिशूला नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. आरोग्य विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे हा प्रकार घडला आहे.
सिरोंचा तालुक्यात तेलंगणा सीमेला लागून असलेल्या आसरअल्ली गावातील सारक्का गगुरी या महिलेची मंगळवारी आसरअल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुती झाली. त्यानंतर या महिलेला अंकिसा येथे पाठविण्यात आले. तेथून सिरोंचा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल व्हा, असा सल्ला देण्यात आला. मात्र गुरूवारी सिरोंचा येथून अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालयात भरती होण्याचा सल्ला देण्यात आला. सिरोंचा येथून अहेरी येथे हलविण्यासाठी १०८ क्रमांकाची टोल फ्री रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे आवश्यक असताना वैद्यकीय अधिकारी व वाहन चालक यांचे पद रिक्त आहे, अशी सबब देऊन आरोग्य प्रशासनाने सुरूवातीला प्रचंड टाळाटाळ केली. परंतु जनरेटा वाढल्यानंतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली व लोकवर्गणी करून नागरिकांनी ३ हजार रूपये या महिलेला व तिच्या नातेवाईकला दिले. मात्र आज सकाळी अहेरी येथे या महिलेचा एक नवजात शिशू दगावला. जन्मलेल्या बालकाला ठेवण्यासाठी वरिल सर्व आरोग्य केंद्रामध्ये कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने या महिलेला आपले एक अपत्य गमवावे लागले. त्यानंतर या महिलेला अहेरी उपजिल्हा रूग्णालयातून गडचिरोली येथे गुरूवारी रात्री हलविण्यात आले. आज दिवसभर आयसीओमध्ये ठेवून बालकावर उपचार करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तत्काळ नागपूर येथे हलवावे लागले. गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे अनेक प्रसुतीचे रूग्ण खेडे गावातून तालुक्यात व तालुक्यातून जिल्ह्यात पाठविले जातात. आरोग्य यंत्रणेची अनास्था या प्रकाराला कारणीभूत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)