चक्काजाम आंदोलनानंतर खरेदी केंद्र सुरू
By Admin | Updated: December 24, 2015 02:02 IST2015-12-24T02:02:54+5:302015-12-24T02:02:54+5:30
धान मळणी सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र आदिवासी विकास महामंडळाने हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने संतप्त झालेल्या कुरखेडा तालुक्यातील ...

चक्काजाम आंदोलनानंतर खरेदी केंद्र सुरू
पुराडा फाट्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन : तीन मार्गावर वाहतूक चार तास ठप्प
कुरखेडा : धान मळणी सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र आदिवासी विकास महामंडळाने हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने संतप्त झालेल्या कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुराडा येथे बुधवारी तब्बल ४ तास वाहतूक रोखून धरल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली व खरेदी केंद्र सुरू करण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पुराडा-रामगड-कोरची या त्रिफुली फाट्यावर हजारोंच्या संख्येत दुपारी १२ वाजतापासून शेतकरी जमा झाले होते. या शेतकऱ्यांनी मुख्य मार्गावरच ठिय्या देऊन तब्बल ४ वाजेपर्यंत सर्व भागातील वाहतूक रोखून धरली. यावेळी प्रथम नायब तहसीलदार पोरेड्डीवार आंदोलनस्थळी आलेत. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र त्यांच्या आश्वासनाने आंदोलकांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच होते. त्यानंतर याबाबतची माहिती भ्रमणध्वनीवरून जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन आदिवासी विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक लांबटकर, सहाय्यक व्यवस्थापक सुरपाम, उपव्यवस्थापक ब्राह्मणकर यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.
शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पुराडा, खेडेगाव, पलसगड या तीन ठिकाणी खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले व लगेच या केंद्राचे उद्घाटनही केले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक खेमनाथ डोंगरवार, हरीशचंद्र डोंगरवार, परशराम नाट, व्यंकटी नागीलवार, देवराव गाहणे, रामलाल हलामी, लोकचंद दरवडे, सरितादेवी ठलाल, देविदास बन्सोड, नाना डोंगरवार, पंढरी मांडवे, डोमदास गावराने, पंढरी डोंगरवार, दिवाकर मारगाये, ऋषी कोराम यांनी केले. याप्रसंगी कुरखेडा तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते.