अखेर चोप येथे रोहयो काम सुरू
By Admin | Updated: June 21, 2016 01:07 IST2016-06-21T01:07:33+5:302016-06-21T01:07:33+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चोप येथे सर्वे क्रमांक ९७८ येथे बोडी खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले

अखेर चोप येथे रोहयो काम सुरू
तहसीलदार पोलीस संरक्षणात पोहोचले : अतिक्रमणधारक शेतकऱ्याने विरोध दर्शवून बोडी खोलीकरणाचे थांबविले होते काम
कोरेगाव/चोप : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चोप येथे सर्वे क्रमांक ९७८ येथे बोडी खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी अतिक्रमण केलेले शेतकरी रूपराम उरकुडा लांजेवार यांनी या बोडी कामास विरोध करून अडथळा निर्माण केला. त्यामुळे मजूर घरी परतले. दरम्यान सोमवारी देसाईगंजचे तहसीलदार अजय चरडे हे पोलीस संरक्षणात कामाच्या ठिकाणी पोहोचले. संबंधित अतिक्रमणधारक शेतकऱ्याला पोलिसांच्या स्वाधीन करून सदर बोडी खोलीकरणाचे काम पूर्ववत सुरू करण्यात आले.
रूपराम लांजेवार यांनी सर्वे नंबर ९७७, ९७८ मधील बोडीच्या जागेत अतिक्रमण करून शेती कसण्यासाठी जागा ताब्यात घेतली होती. दोन महिन्यापूर्वी मजुरांनी सदर काम सुरू केले. मात्र शेतकरी लांजेवार यांनी मजूर व संबंधित यंत्रणेस काम करण्यास मज्जाव केला. त्यानंतर संबंधित यंत्रणेने बोडीच्या जागेची मोजणी केली. यात संबंधित शेतकऱ्यांची ७५ टक्के शेती ही अतिक्रमणात असल्याचे निदर्शनास आले. काम सुरू होण्याच्या वेळी नायब तहसीलदार सोनवाणे, पीएसआय सोनेकर व ३४५ रोहयो मजूर हजर होते. (वार्ताहर)
अतिक्रमणधारक शेतकऱ्याला सिंचन विहिरीचा लाभ
४सदर बोडीच्या जागेत अतिक्रमण करून शेती काढणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांनी याच जागेवर जवाहर सिंचन विहिरीचे काम पूर्ण केले. जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाने या अतिक्रमणधारक शेतकऱ्याला सिंचन विहिरीच्या अनुदानाचा लाभ दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी चोपच्या सरपंच लिला मुंडले, उपसरपंच कमलेश बारस्कर, ग्रा.पं. सदस्य भरत केळझरकर, गौतम लाडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जि.प. सिंचाई विभागाकडे तक्रारही केली आहे.