९० वर्षे उलटूनही जिल्हा मार्गाची दुरूस्ती रखडली
By Admin | Updated: December 8, 2015 01:53 IST2015-12-08T01:53:13+5:302015-12-08T01:53:13+5:30
भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या छत्तीसगड सीमेवरील धानोरा-

९० वर्षे उलटूनही जिल्हा मार्गाची दुरूस्ती रखडली
अल्लाउद्दीन लालानी ल्ल धानोरा
भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या छत्तीसगड सीमेवरील धानोरा-चव्हेला-मुंगनेर-पेंढरी या मार्गाच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. मात्र नक्षल दहशतीमुळे तब्बल ९० वर्षे उलटूनही या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम तसेच या मार्गावरील मोठया पुलाचेही काम रखडले आहे. सदर मार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने आजवर कोणतेही ठोस पावले उचलली नाही. परिणामी या भागातील नागरिकांची पायपीट कायम आहे.
धानोरा-चव्हेला-मुंगनेर-पेंढरी या जिल्हा मार्गाच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या धानोरा बांधकाम उपविभागाकडे आहे तर या मार्गावरील पूल निर्मिती व दुरूस्तीच्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या मार्गावर पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र निधी अभावी मागील तीन वर्षांत या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम झाले नाही. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी गेल्या पाच वर्षांपासून या मार्गावरील महामंडळाची बससेवा बंद आहे. दुचाकी वाहने चालविणेही कठीण आहे. दोन बांधकाम विभागाच्या वादात या मार्गाच्या दुरूस्तीचे काम रखडले आहे. या मार्गावरील बोदीन ते चिमरीकलपर्यंतचा चार किमीचा रस्ता पूर्णत: मुरूमाचा आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे निर्माण होतात.
धानोरा-चव्हेला-पेंढरी मार्गावरील पेकीनमुडझा पयडी गावानजीक बांधलेला रपटा पावसाळ्यात वाहून गेला आहे. या मार्गावर पेंढरी परिसरातील ५० ते ६० खेडेगाव असून या परिसरातील आदिवासी नागरिकांना विविध कामांसाठी पेंढरी-कारवाफा-चातगाव मार्गे धानोरा तालुका मुख्यालयी ये-जा करावे लागते. या मार्गाने ७० किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरिकांचा बराच वेळ व पैशाचा अपव्येय होतो. सदर समस्या लक्षात घेऊन मुंगनेर-बोदीन परिसरातील नागरिकांनी सन १९९९ मध्ये श्रमदान करून या रस्त्याची दुरूस्ती केली होती. त्यानंतर निधीअभावी या रस्त्याची पक्की दुरूस्ती एकदाही करण्यात आली नाही. शासनाच्या नकाशावर १९२४ पासून हा मार्ग अस्तित्वात आहे. मात्र गेल्या ९० वर्षांपासून या मार्गाच्या दुरवस्थेचा वनवास कायम आहे.
लोकप्रतिनिधींचे आश्वासन फोलच
४आजवर अनेक सत्ताधारी पुढाऱ्यांनी तसेच मंत्र्यांनी धानोरा-चव्हेला-मुंगनेर-पेंढरी या मार्गाची कायमस्वरूपी दुरूस्ती करून रहदारीसाठी सदर मार्ग तयार करण्याचे आश्वासन दिले. चव्हेलानजीक पूल निर्मितीसाठी २० लाख रूपयांची गरज असताना केवळ १० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यात वॉल उभारून बांधकाम करण्यात आले.