लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतरही ज्या भागातील नागरिकांनी केवळ डोंगरदऱ्या आणि पायवाटा पाहिल्या, तिथे आज पहिल्यांदाच राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे दर्शन झाले. जिल्हा पोलिस दलाच्या प्रयत्नांमुळे तुमरकोठी ते अहेरी या मार्गावर १७ मार्च रोजी बससेवेचा दिमाखदार प्रारंभ झाला.
भामरागडपासून ३० किलोमीटर आणि अहेरीपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या तुमरकोठी गावात जेव्हा पहिली बस दाखल झाली, तेव्हा गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अबालवृद्धांनी पारंपरिक वाद्ये वाजवून आणि नृत्ये करून बसचे स्वागत केले. शालेय विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन 'भारत माता की जय'च्या घोषणा देत या विकासाच्या पर्वाचे स्वागत केले.
आता तुमरकोठीचा विकास सुसाटा: वर्षानुवर्षे केवळ खांद्यावरून आजारी माणसांना नेणारे किंवा डोक्यावर ओझे वाहणारे गावकरी आता सन्मानाने बसने प्रवास करतील. गडचिरोली पोलिस दल केवळ शस्त्रे घेऊन लढत नाही, तर विकासाची लेखणी घेऊन दुर्गम भागाचे भविष्य लिहित असल्याचे या निमित्ताने दिसून आले.
"पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. माओवादग्रस्त भागात केवळ रस्तेच नाही, तर सुरक्षितता प्रदान करून पोलिस दल जनसेवेचे काम करत आहे. या मार्गावर बस सुरू झाल्याने कोठी, तुमरकोठी आणि परिसरातील ४५० ते ५०० नागरिकांचे जीवनमान सुसह्य होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अहेरी किंवा गडचिरोलीला जाणे आता सोपे होणार आहे."- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली.
Web Summary : After 79 years, a bus service started in Tumarkothi, Gadchiroli. Villagers celebrated with traditional music and dance. This initiative, driven by the police, promises improved access to education and healthcare for residents.
Web Summary : 79 वर्षों बाद, गडचिरोली के तुमरकोठी में बस सेवा शुरू हुई। ग्रामीणों ने पारंपरिक संगीत और नृत्य के साथ जश्न मनाया। पुलिस द्वारा संचालित इस पहल से निवासियों के लिए शिक्षा और स्वास्थ्य सेवा तक बेहतर पहुंच का वादा किया गया है।