दिलीप दहेलकर लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे अनुपालन करण्याच्या दृष्टीने राज्य पातळीवर 'विशेष शिक्षक' या पदाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, शासनाच्या आदेशान्वये शिक्षण आयुक्तांच्या पत्रानंतर जि. प. च्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे गतीने व पारदर्शकपणे कार्यवाही करीत जिल्ह्यातील ४९ कंत्राटी विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. तब्बल १६ वर्षानंतर जिल्ह्यातील कंत्राटी विशेष शिक्षक सेवेत कायम झाले आहेत.
जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी २४ जून रोजी २०२५ या विशेष शिक्षकांचे शासन सेवेत समायोजन करण्याचा आदेश काढले आहेत. विशेष या शिक्षकांना केंद्रस्तरावर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. राज्यात सद्यस्थितीत उपलब्ध रिक्त पदांपैकी प्रत्येक केंद्र स्तरावर एक याप्रमाणे जिल्ह्यात कार्यरत कंत्राटी विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यास शासनाने ६ जून २०२५ रोजी मान्यता दिली. त्यानुसार जिल्ह्यात समग्र शिक्षाच्या समावेशित शिक्षण या उपक्रमात कार्यरत ४९ कंत्राटी विशेष शिक्षकांचे कायमस्वरूपी समायोजन करण्यात आले आहे. सीईओ सुहास गाडे व डेप्युटी सीईओ शेखर शेलार यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, सहायक प्रशासन अधिकारी धनंजय दुम्पेट्टीवार यांनी कार्यवाही केली.
आयुक्तांच्या पत्रानंतर १२ दिवसांत कार्यवाहीविशेष शिक्षकांना शासन सेवेत कायम करण्याबाबतचा शासन निर्णय ८ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित झाला. या शिक्षकांना शासन सेवेत समायोजन करण्याचे पत्र ११ जून २०२५ ला आयुक्त (शिक्षण) कार्यालयातून प्राप्त झाले. त्यानंतर अवघ्या १२ दिवसात कंत्राटी विशेष शिक्षकांचे आदेश काढले.
कोणत्या केंद्रात झाले शिक्षकांचे समायोजन ?गडचिरोली पंचायत समितीमधील मुरखळा, गुरवळा, आंबेशिवणी, येवली, अमिर्झा, काटली व बोदली तसेच देसाईगंज पं. स.तील कुरूड, पोटगाव केंद्रावर शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तसेच अहेरी, बोरी, भामरागड, कोरची, बेडगाव, बोटेकसा, आरमोरी, वडधा, मोहझरी, जोगीसाखरा, पिसेवडधा, सिर्सी, मुलचेरा, कारवाफा, गेवर्धा, एटापल्ली, बुर्गी, महागाव, गांधीनगर, गोठणगाव, मालेवाडा, येरकड, तळोधी, रांगी, रंगयापल्ली व आलापल्ली आदी केंद्रांवर शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. बाराही तालुक्यात नियुक्त्या झाल्या आहेत.