कनेक्टीव्हिटीअभावी बँकांचे व्यवहार प्रभावित
By Admin | Updated: December 7, 2014 22:50 IST2014-12-07T22:50:07+5:302014-12-07T22:50:07+5:30
सहकारी बँकांसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार आॅनलाईन झाले आहेत. मात्र जिल्ह्याच्या अर्ध्याभागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीच नाही. त्यावर उपाय म्हणून बँकांनी लाखो रूपये खर्चून व्ही-सॅट

कनेक्टीव्हिटीअभावी बँकांचे व्यवहार प्रभावित
गडचिरोली : सहकारी बँकांसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार आॅनलाईन झाले आहेत. मात्र जिल्ह्याच्या अर्ध्याभागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीच नाही. त्यावर उपाय म्हणून बँकांनी लाखो रूपये खर्चून व्ही-सॅट यंत्रणा बसविली आहे. मात्र सदर यंत्रणासुध्दा व्यवस्थित काम करीत नसल्याने बँकेचे व्यवहार प्रभावित झाले असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
बँक व्यवहारांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता येत असल्याने नागरिक बँकेच्या माध्यमातून व्यवहार करीत आहेत. त्यामुळे सहकारी बँकांसह राष्ट्रीयकृत बँकांनी ग्रामीण व दुर्गम भागात हळूहळू आपले जाळे पसरविण्याला सुरूवात केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५४ शाखा व राष्ट्रीयकृत बँकेच्यासुध्दा शाखा आहेत. या सर्व बँकांचे व्यवहार आॅनलाईन झाले आहेत. बँक खात्यातून पैसे काढण्यापासून ते बँक खात्याचे व्यवहार तपासण्यासाठीसुध्दा आॅनलाईन कनेक्टीव्हीटी असणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधीत खातेच उघडत नाही.
गडचिरोली जिल्ह्याचा ७८ टक्के भाग जंगलांनी व्यापला आहे. दुर्गम व ग्रामीण भागातून उत्पन्न कमी मिळत असल्याने खासगी दूरसंचार कंपन्या गडचिरोली जिल्ह्यात नेट कनेक्टीव्हीटी पुरविण्यास अनुत्सूक आहेत. त्यामुळे संपूर्ण मदार बीएसएनएलवर अवलंबून आहे. या कंपनीचेही अनेक भागामध्ये ब्रॉडबँड पोहोचली नाही. त्यामुळे नेट कनेक्टीव्हीटी मिळत नाही. ज्या गावांमध्ये बँक आहे. त्या ठिकाणी ब्रॉडबँड नसल्याने काही बँकांनी लाखो रूपये खर्चून व्ही-सॅट यंत्रणा खरेदी केली आहे. मात्र या यंत्रणेची स्पीड ब्रॉडबँडपेक्षा अत्यंत कमी राहत असल्याने कर्मचाऱ्यांसह ग्राहकही त्रस्त झाले आहेत.
व्ही-सॅट यंत्रणा सद्य:स्थितीत राष्ट्रीयकृत बँकांसह सहकारी बँकांनीही खरेदी केली आहे. व्ही-सॅट यंत्रणेवर असलेली इंटरनेट कनेक्टीव्हीटी कधी गायब होईल, याचा नेम राहत नाही. ज्या ठिकाणी बँक आहे. त्या ठिकाणी बीएसएनएलने ब्रॉडबँड सेवा पुरविण्यात यावी, अशी मागणी आजपर्यंत अनेकवेळा करण्यात आली आहे. मात्र बीएसएनएलनेही खर्चाच्या तुलनेत अपेक्षीत उत्पन्न मिळत नसल्याचे कारण पुढे करीत या ठिकाणी ब्रॉडबँड सेवा पुरविण्यास नकार दिल्याने बँकांचीही पंचाईत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)