ट्रक अंगावरून जाऊनही वाचली वयस्क महिला
By Admin | Updated: April 7, 2017 01:07 IST2017-04-07T01:07:38+5:302017-04-07T01:07:38+5:30
ट्रकच्या अगदी मधोमध पडल्याने ट्रक अंगावरून जाऊनही महिला सुखरूप बचावल्याची घटना

ट्रक अंगावरून जाऊनही वाचली वयस्क महिला
इंदिरा गांधी चौकातील घटना : दुचाकीवरून खाली पडल्याने घडला अपघात
गडचिरोली : ट्रकच्या अगदी मधोमध पडल्याने ट्रक अंगावरून जाऊनही महिला सुखरूप बचावल्याची घटना स्थानिक इंदिरा गांधी चौकात गुरूवारी सायंकाळी ५.४५ वाजता सुमारास घडली.
गीताबाई उईके (६२) रा. येरकड ता. धानोरा असे सुखरूप बचाविलेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. गीताबाई उईके या आपल्या नातेवाईकांसोबत चामोर्शी येथे गेल्या होत्या. गडचिरोली येथील लांजेडा वार्डात नातेवाईक राहत असल्याने ते गडचिरोली येथे थांबणार होते. चामोर्शीवरून लांजेडा वार्डाकडे जाताना इंदिरा गांधी चौकातील वाहतूक दिवे रेड सिग्नल दाखवित असल्याने ते चौकात सिग्नल सुरू होण्याची वाट पाहत होती. त्याचवेळी सिग्नल बंद असल्याने चामोर्शीवरून आरमोरीकडे जाणारा सी. जी. ०७ सीए ८६१५ क्रमांकाचा ट्रकही थांबला होता. सिग्नल सुरू होताच ट्रक व गीताबाई उईके यांची दुचाकी व ट्रक आपापल्या मार्गाने निघाल्या. दरम्यान चामोर्शी मार्गावरून धानोरा मार्गाकडे वळत असताना गर्दीतील एका दुचाकीस्वाराने कट मारल्याने गीताबाई उईके या दुचाकीवरून खाली कोसळल्या. त्याचवेळी ट्रकही येत असल्याने त्या सरळ ट्रकच्या खाली आल्या. चौकातील नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केल्याने ट्रक खाली कोणीतरी सापडला आहे ही बाब चालकाच्या लक्षात आली. मात्र तोपर्यंत ट्रक समोर निघाला होता व गीताबाई उईके या सुखरूप बाहेर पडल्या. त्यांच्या खांद्याला थोडाफार मार लागला. मात्र इतरत्र कुठेही जखम झाली नाही. वाहतूक पोलिसांनी तत्काळ गीताबाईला उचलून वाहतूक पोलीस चौकीमध्ये नेले.
अपघात झाल्याची वार्ता सभोवताल परसरताच सभोवतालचे दुकानदार, ये-जा करणाऱ्या नागरिकांनी गीताबाई उईके यांना पाहण्यासाठी तसेच अपघात नेमका कसा झाला हे विचारण्यासाठी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी जिप्सी बोलविली. त्यानंतर गीताबाई उईके यांना रूग्णालयात भरती केले. अपघात झाल्यानंतर जवळपास तास भर चौकात गीताबाई उईके यांच्या अपघाताच्या चर्चेचा विषय बनला होता. पोलिसांनी चौकात थांबलेला ट्रक पोलीस स्टेशनमध्ये जमा केला. त्याचबरोबर वाहनचालकालाही ताब्यात घेतले. (नगर प्रतिनिधी)