झेरॉक्स कागदपत्रावरही केली होती अ‍ॅडमिशन

By Admin | Updated: March 6, 2015 01:24 IST2015-03-06T01:24:56+5:302015-03-06T01:24:56+5:30

आलापल्ली येथील महात्मा गांधी कॉलेजमध्ये गतवर्षी प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना केवळ झेरॉक्स कागदपत्रावर प्रवेश देण्यात आले.

Admissions to Xerox documents were also made | झेरॉक्स कागदपत्रावरही केली होती अ‍ॅडमिशन

झेरॉक्स कागदपत्रावरही केली होती अ‍ॅडमिशन

आलापल्ली : आलापल्ली येथील महात्मा गांधी कॉलेजमध्ये गतवर्षी प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना केवळ झेरॉक्स कागदपत्रावर प्रवेश देण्यात आले. याच विद्यार्थ्यांनी शहरातील दुसऱ्याही महाविद्यालयातून प्रवेश घेतल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
महात्मा गांधी कॉलेजमध्ये गतवर्षी प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीच नाही. तर काही विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत सुचनाही महाविद्यालयाकडून मिळाली नसल्याने परीक्षेपासून वंचित राहिले. गतवर्षी काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यात आले होते. त्यांच्या नावावर शिष्यवृत्ती उचलण्यात आली. ही माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. कॉलेजच अचानक गायब झाल्याचे वृत्त ५ मार्च रोजी लोकमतमध्ये झळकताच ज्या विद्यार्थ्यांनी यंदा प्रवेशासासाठी महाविद्यालयात मुळ कागदपत्रे दिली होती. ते विद्यार्थी आता आपले मुळ कागदपत्र मिळविण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याच कॉलेजमधील एका कर्मचाऱ्याकडे कॉलेजच्या चाव्या असतांना सायंकाळच्या सुमारास अचानक एक दिवस कॉलेजचे साहित्य लांबविण्यात आले. यामध्ये १४ संगणक, २५ डेक्स- बेंच, आलमारी, खुर्च्या, कार्यालयीन कागदपत्र असल्याची माहिती आहे. काही नागरिकांनी कॉलेज अचानक कसं काय हलवून राहिले, अशी विचारणा सामान नेणाऱ्यांना केली असता, कॉलेज आष्टी येथे स्थानांतरीत होत असल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी आज लोकमतशी बोलतांना दिली.
कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांपासून पगार न देणे तसेच घरमालक, कर्मचारी तसेच कॉलेजमधील प्रवेशधारक विद्यार्थ्यांना सूचना न देता, चालू शैक्षणिक वर्षात अचानकपणे कॉलेज रातोरात स्थानांतरण करणे, स्थानांतरणाची कोणतीही सूचना फलक लावून न देणे. आदिवासी विकास विभागाच्या पत्राला उत्तर न देणे या सर्व बाबी शिष्यवृत्ती घोटाळ्यात या महाविद्यालयाने काहीतरी रक्कम उचल केल्याच्या प्रकाराला बळकटी देणाऱ्या आहेत. अहेरीच्या आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकरणी संबंधित संस्थाचालकाच्या विरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल करावी, अशी मागणी या भागातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
तसेच ज्या विद्यार्थ्यांनी येथे प्रवेश घेतला, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याचीही काळजी आदिवासी विकास विभागाने घ्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे. (वार्ताहर)
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरीच्या तीन सदस्यीय समितीने महाविद्यालयाची चौकशी करण्यासाठी सुरूवात केली. मात्र त्यावेळी महाविद्यालय बंद स्थितीत असल्याने दस्तावेज समितीला मिळाले नाही. संस्थेला लेखी स्वरूपात कागदपत्र सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. या संदर्भात दोन दिवसात कागदपत्र सादर न झाल्यास संबंधित संस्थेविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसा अहवालही आदिवासी विकास विभागाचे आयुक्त नाशिक यांना पाठविण्यात आला आहे.
- एन. एस. मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी, अहेरी

Web Title: Admissions to Xerox documents were also made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.