प्रशासकीय इमारत बांधकाम रखडले

By Admin | Updated: November 7, 2015 01:32 IST2015-11-07T01:32:01+5:302015-11-07T01:32:01+5:30

कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम मागील चार वर्षांपासून रखडले आहे.

Administrative building construction halted | प्रशासकीय इमारत बांधकाम रखडले

प्रशासकीय इमारत बांधकाम रखडले

कढोली येथील नागरिकांची अडचण : चार वर्षे उलटली; कंत्राटदाराने बांधकाम अर्ध्यावरच सोडले
कढोली : कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम मागील चार वर्षांपासून रखडले आहे. कंत्राटदाराने अर्ध्यावरच काम सोडून दिल्याने सदर इमारतीचे बांधकाम रखडले आहे.
प्रशासकीय कामे करण्यासाठी एकाच गावात ग्राम पंचायत, तलाठी कार्यालय, उपकेंद्र आदी प्रकारचे विविध कार्यालये राहतात. ही सर्व कार्यालये विखुरलेली राहत असल्याने नागरिकाला या कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात. यामध्ये बराच शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागते. ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी ठेवल्यास नागरिकांना चकरा मारण्याची गरज भासणार नाही, यासाठी शासनाने प्रत्येक मोठ्या गावात प्रशासकीय इमारत बांधण्याची संकल्पना पुढे आणली. त्यानुसार जिल्हाभरातील काही मोठ्या गावांमध्ये प्रशासकीय इमारती बांधण्यातसुद्धा आल्या आहेत.
कढोली हे कुरखेडा तालुक्यातील मध्यवर्ती व मोठे गाव आहे. या गावाची लोकसंख्या पाच हजाराच्या जवळपास आहे. त्यामुळे या गावातही प्रशासकीय इमारत बांधण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार इमारतीचे बांधकाम सुरू झाले. इमारतीचे बांधकाम करण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. कंत्राटदाराने जमिनीपासून चार फूट अंतरापर्यंत पायव्याचे बांधकाम केले आहे. त्यानंतर मात्र सदर बांधकाम अर्धवटच ठेवून दिले. तेव्हापासून बांधकामाला सुरुवातच झाली नाही.
कढोली गावाच्या विकासात प्रशासकीय इमारत मैलाचा दगड ठरणार असल्याने गावकऱ्यांनी या इमारतीचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, यासाठी अनेकवेळा निवेदने दिली व बांधकाम सुरू करण्याबाबत मागणी केली. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही बांधकामाला सुरुवात झाली नाही. सदर कंत्राटदार बांधकाम करण्यास तयार नसेल तर त्याच्या हातून कंत्राट काढून सदर काम दुसऱ्या कंत्राटदाराला देण्यात यावे. मात्र कोणत्याही परिस्थितीत बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी कढोली येथील नागरिकांनी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Administrative building construction halted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.