कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या घरी जाणार प्रशासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST2021-06-05T04:26:36+5:302021-06-05T04:26:36+5:30
जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतखाली झाली. या बैठकीला सचिव जिल्हा विधि सेवा प्राधिकरण यांचे प्रतिनिधी, जिल्हा शल्यचिकित्सक, ...

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या घरी जाणार प्रशासन
जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतखाली झाली. या बैठकीला सचिव जिल्हा विधि सेवा प्राधिकरण यांचे प्रतिनिधी, जिल्हा शल्यचिकित्सक, पोलीस विभागाचे प्रतिनिधी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष, तसेच कृती दलाचे सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यात कोविड या महामारीमुळे ज्या पालकांचा मृत्यू झाला अशा कुटुंबातील बालकांची यादी कृती दलासमक्ष ठेवण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी अनाथ, निराधार, निराश्रित बालकांच्या घरी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी/ कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित बालकांना व त्यांच्या कुटुंबाना तातडीने कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याबाबतचा अहवाल तातडीने कृती दलास सादर करण्याचे निर्देशित केले. या बालकांना अन्न, धान्य, आरोग्य सुविधा, कायदेविषयक सुविधा, समुपदेशन सुविधा, महिला व बालविकास विभागाच्या, तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत सूचना दिल्या. अशा बालकांच्या बाबतीत शासकीय यंत्रणेने अतिशय संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी सूचित केले. या कामकाजाच्या अनुषंगाने तालुकानिहाय समित्यांचे गठन करण्यात आले आहे. या समितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कोविड महामारीमुळे अनाथ, निराधार, निराश्रित झालेल्या बालकांना आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे नियोजन करण्यात आले. कोविडमुळे बालकांचे पालक गमावलेल्या मुलांसाठी मदत हवी असल्यास तातडीने चॉईल्ड लाईन टोल फ्री क्रमांक १०९८ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.