मुख्याध्यापकांचे समायोजन करा
By Admin | Updated: December 27, 2014 01:42 IST2014-12-27T01:42:38+5:302014-12-27T01:42:38+5:30
मागील शैक्षणिक सत्रात अतिरिक्त ठरलेल्या १६२ मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

मुख्याध्यापकांचे समायोजन करा
अहेरी : मागील शैक्षणिक सत्रात अतिरिक्त ठरलेल्या १६२ मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.
सप्टेंबर २०१४ मध्ये करण्यात आलेल्या पटपडताळणीनुसार जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या एकूण २६३ मुख्याध्यापकांपैकी १६२ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. तर एकूण ३ हजार ९११ शिक्षकांपैकी २४१ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. पदवीधर प्राथमिक शिक्षकांची पदे शिक्षण हक्क कायद्यानुसार वाढत आहेत. जिल्ह्यात ३०४ पदवीधर शिक्षक आहेत. प्रत्यक्षात मात्र ७९५ पदे मंजूर आहेत. त्यामुळे ४९१ पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
एक वर्षाचा कालावधी लोटूनही शिक्षक व मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात आले नाही. उलट खासगी शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषद शाळांमध्ये केले जात आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रथम सेवा देत असलेल्या शिक्षकांचे समायोजन न करता खासगी शिक्षण संस्थेतीतील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या समायोजनाला प्राधान्य का दिला जात आहे, असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या शिक्षक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
खासगी संस्थांमधील शिक्षकांना तालुकास्थळानजीकच्या शाळांमध्ये रूजू करून घेतल्या जात आहे. त्यामुळे यानंतर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे समायोजन झाल्यास त्यांना दुर्गम भागात पाठविले जाण्याची शक्यता आहे. हा एक प्रकारचा जिल्हा परिषद शिक्षकांवर होत असलेला अन्याय आहे. त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांचे समायोजन करीत असताना शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी केली आहे. हा अन्याय दूर न झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)