आश्रमशाळा शिक्षकांचे समायोजन करा
By Admin | Updated: June 20, 2016 01:13 IST2016-06-20T01:13:05+5:302016-06-20T01:13:05+5:30
आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे इतरत्र समायोजन होईलपर्यंत त्यांना काम नाही,

आश्रमशाळा शिक्षकांचे समायोजन करा
शिक्षक संघटनेची मागणी : पगार नाकारणारा जीआर रद्द करा; पत्रकांची केली होळी
अहेरी : आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे इतरत्र समायोजन होईलपर्यंत त्यांना काम नाही, वेतन नाही, असे धोरण ८ जून २०१६ च्या शासन निर्णयानुसार स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे सदर निर्णय रद्द करून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे इतरत्र समायोजन करून त्यांना वेतन द्यावे, या मागणीसाठी शनिवारी नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तांच्या कार्यालयासमोर शिक्षक भारती आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
आश्रमशाळा न चालविल्यामुळे किंवा विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने आश्रमशाळा बंद पडतात. अशा कर्मचाऱ्यांचे आत्तापर्यंत इतरत्र समायोजन करून त्यांचे वेतन दिले जात होते. आश्रमशाळा बंद पडण्यामागे भौतिक सुविधा नसणे हे प्रमुख कारण आहे. इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण आदिवासी भागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे पहिली ते चौथीपर्यंत वर्ग बंद पडत असून मोठ्या प्रमाणात शिक्षक व कर्मचारी अतिरिक्त ठरत आहेत. त्यामुळे काम नाही, वेतन नाही, या धोरणामुळे कर्मचाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर निर्णय रद्द करून आश्रमशाळांचा दर्जा सुधारावा, समायोजित कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे, आश्रमशाळेतील विद्यार्थी संख्येची अट शिथील करावी, आश्रमशाळांचा दर्जा सुधारावा, अनुदानात वाढ करावी, आश्रमशाळेत इंग्रजी माध्यम, सेमी इंग्रजी वर्ग सुरू करावे या मागण्यांसाठी २५ जून रोजी आंदोलन करणार आहे, अशी माहिती शिक्षक भारती आश्रमशाळा संघटनेचे विभागीय अध्यक्ष महादेव बासनवार यांनी दिली आहे.
आंदोलनात राजेंद्र झाडे, दिलीप तडस, संजय खेडीकर, आलबनकार, संतोष पेशट्टीवार व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)