आदिवासींनी स्वत: निर्णय घ्यावा

By Admin | Updated: November 18, 2016 01:20 IST2016-11-18T01:20:47+5:302016-11-18T01:20:47+5:30

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात सुरजागड लोहखनिज प्रकल्पाबाबत कारखानदाराबरोबर करार झाला आहे.

Adivasis should decide for themselves | आदिवासींनी स्वत: निर्णय घ्यावा

आदिवासींनी स्वत: निर्णय घ्यावा

पालकमंत्र्यांचे आवाहन : लोहप्रकल्पावर दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहा
एटापल्ली : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात सुरजागड लोहखनिज प्रकल्पाबाबत कारखानदाराबरोबर करार झाला आहे. या करारामुळे उत्खनन करून ते कुठेही माल नेऊन प्रकल्प उभा करू शकतात. हा करार करणारे लोक आज सत्तेतून बाहेर गेल्यावर हा प्रकल्प येथेच झाला पाहिजे, अशी भूमिका घेत आहेत व आदिवासी जनतेला अडचणीत आणत आहेत. पेसा कायद्यांतर्गत या खनिज संपत्तीवर तुमचा अधिकार असल्याचे सांगून सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम काही राजकीय नेते व स्वयंघोषीत संघटना करीत असल्याचा घणाघाती आरोप गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केला. बुधवारी हेडरी या अतिदुर्गम भागातील ७० गावातील नागरिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी पं.स.चे सभापती दीपक फुलसंगे, रमेश लेकामी, डोलू दुर्वा, भाजपा तालुका अध्यक्ष नवीन बाला, पोलीस पाटील देऊजी पुसा कवडो, रमा लेकामी, चंद्राजी सडमेक, कल्पना आलाम, दिलीप मट्टामी, मुन्सी हिचामी, उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव, रावजी आलाम, चंदू दोरपेटी, बाबुराव गंप्पावार, रघुजीत तलांडे, उलगे कवडो, सचिन पेदापल्लीवार, सरीता कोटा, सुधाकर आत्राम आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले की, हा प्रकल्प येथेच झाला पाहिजे किंवा येथील खनिज बाहेर नेऊन प्रक्रिया करावी लागेल, याबाबत जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत आपण उभे राहू. येथील बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला पाहिजे ही आपली भूमिका असून खनिज संपत्तीची ३० टक्के रक्कम स्थानिक विकासावर खर्च करायची आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता स्थानिक नागरिकांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. याप्रसंगी लोह खनिजाच्या उत्खनन कामावर जाणाऱ्या ४०० मजुरांसोबतही पालकमंत्र्यांनी संवाद साधला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Adivasis should decide for themselves