नेलगुंडा गावातील आदिवासींना पोलिसांकडून बेदम मारहाण
By Admin | Updated: November 22, 2015 01:17 IST2015-11-22T01:17:44+5:302015-11-22T01:17:44+5:30
भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावातील नागरिकांना धोडराज व लाहेरी पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता घडली.

नेलगुंडा गावातील आदिवासींना पोलिसांकडून बेदम मारहाण
पोलिसांचा केला ग्रामस्थांनी निषेध : दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावातील नागरिकांना धोडराज व लाहेरी पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता घडली. भामरागडपासून २२ किमी अंतरावर असलेल्या नेलगुंडा येथे २०० च्या संख्येत असलेल्या पोलिसांची फौज शुक्रवारी सकाळी दाखल झाली. गावात नक्षलवादी आले आहेत, असे म्हणत पोलिसांनी गावातील प्रत्येक नागरिकास बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी काही काळ पोलिसांच्या बाजुने गोळीबारही करण्यात आला. जवळजवळ ५० ग्रामस्थांना गावाजवळील साधना विद्यालयाजवळ पोलिसांनी बराचवेळ ओलीस ठेवले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना दिली.
पोलिसांनी केलेल्या या मारहाणीचा नेलगुंडा गावातील नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. गावात नक्षलवादी नसतानाही गावकऱ्यांना बंदुकीच्या बळावर धमकावून बेदम मारहाण करण्यात आली व विनाकारण गावातील बाजू वंजा वड्डे, रामजी मंगरू मुहन्दा या दोघांना नक्षलवादी असल्याचे सांगत पोलिसांनी सोबत नेले. शनिवारपर्यंत त्यांची सुटका करण्यात आली नव्हती. पोलिसांच्या या विनाकारण मारहाणीमुळे नेलगुंडा गावातील ग्रामस्थ दहशतीखाली असून पोलिसांकडून आदिवासींवर अन्याय झाला असल्याचे नेलगुंडाचे ग्रामस्थ सदाशिव वाले वड्डे, दिलीप मोतीलाल पेंदाम, सुगदेव मंग्गा कन्नाके, डोलू वत्ते आवले, प्रकाश आनंदराव कुसराम, रैनू चिन्ना पुंगाटी, कोदा कोटे पुंगाटी, राजेश वाले वड्डे, मोतीराम पोच्चा पेंदाम, आमलू नरांगो वड्डे, रैनू मुल्ला वड्डे, मालू सोमा वाचामी, चुक्कू मंगरू वड्डे, कोमटी गंगा वाचामी, विलश पांडुरंग आत्राम, प्रकाश मंग्गा कन्नाके, बिरजू कोलू तेलामी, पेंटा दासरू कन्नाके, सकाराम सोमा आत्राम, शंकर पांडू पुंगाटी, राजू रामा वरर्से, पुसू नरांगो आवले आदींनी म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)