तीन हजार कृषी वीजपंप जोडा
By Admin | Updated: May 3, 2015 01:08 IST2015-05-03T01:08:44+5:302015-05-03T01:08:44+5:30
चांगल्या उगणवक्षतेचे बियाणे, योग्य वेळेत खत पुरवून सिंचनाच्या सूक्ष्म नियोजनाद्वारे ...

तीन हजार कृषी वीजपंप जोडा
गडचिरोली : चांगल्या उगणवक्षतेचे बियाणे, योग्य वेळेत खत पुरवून सिंचनाच्या सूक्ष्म नियोजनाद्वारे २ हजार ९५१ कृषी वीजपंपाची जोडणी चालू आर्थिक वर्षात पूर्ण करून शेतकऱ्याच्या हिताचा प्राधान्यांने विचार करा, असे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. आढावा बैठकीला खा. अशोक नेते, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, आ. क्रिष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार घावटे, नगराध्यक्ष निर्मला मडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुडमूलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम उपस्थित होते.
महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने कृषी विजपंपांची जोडणी करण्याच्या सूचना अनेकदा देऊनही स्थानिक पातळीवर काम अद्यापही पूर्ण झाले नाही. या कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून दंड आकारावा, तसेच ट्रान्सफार्मबाबत योग्य दक्षता घेऊन शेतकऱ्यांना वेळेत पिकांकरिता पाणी द्यावे, झालेल्या कामाची पाहणी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन करावी, तसेच पाण्याबाबत सूक्ष्म नियोजन करून बदलत्या वातावरणाचा अभ्यास करावा व शेतीला पाणी द्यावे. कॅनलची वेळीच दुरूस्ती करून पाणी निचरा होणार नाही, याची प्रामुख्याने काळजी घ्यावी, पाणीवाटप संस्थांना विश्वासात घ्यावे, सौरऊर्जेद्वारे सिंचनाची योग्य सोय ज्या ठिकाणी करण्यात आली आहे, तेथील पंप सुस्थितीत करावे, अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक, सातत्याने विचारविनिमय करून सर्व कामे पार पाडावीत, अशा सूचनाही अम्ब्रीशराव आत्राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना अधिक उगवणक्षमता असलेली बियाणे उपलब्ध करून द्यावीत, खत पुरवठादारांनी नियमाप्रमाणे खताची विक्री करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुडमुलवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)