झाडियाचा सूचीत समावेश करा
By Admin | Updated: December 6, 2015 01:21 IST2015-12-06T01:21:24+5:302015-12-06T01:21:24+5:30
झाडे, झाडिया या जमातीच्या नागरिकांचा राज्य घटनेच्या सूचीत समावेश करून त्यांना जमात प्रमाणपत्र देण्यात यावे, ...

झाडियाचा सूचीत समावेश करा
न्यायासाठी लढा : १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
गडचिरोली : झाडे, झाडिया या जमातीच्या नागरिकांचा राज्य घटनेच्या सूचीत समावेश करून त्यांना जमात प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सुशील कोहाड, एक असंशोधित आदिम जमात संघटनेचे सचिव जयेंद्र बर्लावार, अध्यक्ष अनिल मंटकवार यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
गडचिरोली व छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा या जिल्ह्यात झाड्या समाज वास्तव्यास आहे. या समाजाची लोकसंख्या जवळपास ३ लाख एवढी आहे. या समाजाला झाडिया, झाड्या, झाडे, झारे, झारीया, जाडी, झाडी, झारेया असे संबोधले जाते. सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या या समाजाचा राज्य घटनेच्या कोणत्याच सूचीत समावेश नाही. त्यामुळे या समाजाला जात किंवा जमात प्रमाणपत्र मिळत नाही. शासन दरबारी या समाजाची अजिबात नोंद नाही. परिणामी दाखले मिळण्यास अडचण होत आहे. या समाजाची संस्कृती आदिम असल्याने अनुसूचित जमाती प्रवर्गात या समाजाचा समावेश करावा तसेच जातीची नोंद शासनाने करावी या मागणीसाठी १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला चंद्रपूर, गडचिरोली, दंतेवाडा जिल्ह्यातील सुमारे २५ हजार नागरिक सहभागी होतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉ. कोहाड, अनिल मंटकवार यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)