ग्रंथाशी जीवनाची सांगड घाला- जयस्वाल
By Admin | Updated: January 21, 2016 00:10 IST2016-01-21T00:10:35+5:302016-01-21T00:10:35+5:30
साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून गं्रथांबाबत जागृती घडून येते. पुस्तके वाचता वाचता माणसं वाचायला शिका, माणसं वाचल्यावर अर्थात माणसं समजल्यावर खऱ्या अर्थाने निसर्ग कळतो.

ग्रंथाशी जीवनाची सांगड घाला- जयस्वाल
तीन दिवसीय कार्यक्रम : गं्रथ महोत्सवाचे थाटात उद्घाटन
गडचिरोली : साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून गं्रथांबाबत जागृती घडून येते. पुस्तके वाचता वाचता माणसं वाचायला शिका, माणसं वाचल्यावर अर्थात माणसं समजल्यावर खऱ्या अर्थाने निसर्ग कळतो. ग्रंथातून विचारांची देवाणघेवाण होते. ग्रंथातील विचार आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरविण्याची गरज आहे. त्याकरिता ग्रंथ , पुस्तकाच्या मर्माशी जीवनाची सांगड घाला, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल यांनी केले.
शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी येथे शिवाजी महाविद्यालयाच्या कवीवर्य मंगेश पाडगावकर नगरीत ग्रंथ महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे होते. प्रमुख अतिथी म्हणूून माजी प्राचार्य डॉ. एन. एस. पठाण, नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक, जि. प. समाजकल्याण सभापती विश्वास भोवते, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, आर. पी. निकम, गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, समशेर खॉ पठाण आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. डॉ. जयस्वाल म्हणाले, पुस्तक वाचनातून संस्कारशीलता निर्माण होते, पालकांनी ग्रंथ वाचनाची सवय लावल्यास मुलेही वाचन संस्कृतीकडे वळतील, पुस्तक वाचल्यानंतर मन व बुद्धीची सुपिकता चांगली राहिल्यास नक्कीच पुस्तकरूपी ज्ञानाचे अंकुर बहरल्याशिवाय राहणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी डॉ. एन. एस. पठाण म्हणाले, ग्रंथ मानवाचे गुरू आहेत. माणसाला सदैव जागे ठेवण्याचे महत्त्वाचे काम ग्रंथ व पुस्तके करतात. देशात सहिष्णूता टिकविण्यात ग्रंथ परंपरेचा मोठा वाटा आहे, देशात १९२५ च्या पूर्वी अनेक मोठे विचारवंत होऊन गेले. त्यानंतर ८५ वर्षांच्या काळात नव्या विचाराची निर्मिती झाली नाही, असेही ते म्हणाले. आपण काय वाचतो यापेक्षा आपण कसे वाचतो याला अतिशय महत्त्व आहे. आपल्यातील दडलेली प्रतिभाशक्ती जो आपल्याला सांगतो तोच खरा गुरू व शिक्षक आहे. त्यामुळे स्वत:ला ओळखून वाचन संस्कृतीतून विचारसंपन्न व्हा, असे आवाहन डॉ. पठाण यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (माध्य.) नानाजी आत्राम, संचालन नंदकिशोर मांडवे, विद्या आसमवार यांनीे तर आभार विभा डांगे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)