चौकशी न करता सूडबुद्धीने केली कारवाई
By Admin | Updated: April 7, 2016 01:30 IST2016-04-07T01:30:14+5:302016-04-07T01:30:14+5:30
महसूल, पोलीस व नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी न करता हेतुपुरस्सर सूडबुद्धीने आमचे टिनशेडचे घर जमीनदोस्त करून ...

चौकशी न करता सूडबुद्धीने केली कारवाई
गडपल्लीवार कुटुंबीयांचा आरोप : महसूल, पोलीस, न. प. अधिकाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : महसूल, पोलीस व नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी न करता हेतुपुरस्सर सूडबुद्धीने आमचे टिनशेडचे घर जमीनदोस्त करून आमच्यावर खोट्या तक्रारीच्या आधारे गुन्हे दाखल करून कारागृहात रवानगी केली, असा आरोप करीत गडचिरोलीचे तहसीलदार भोयर, एसडीपीओ डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक तसेच जेसीबी, ट्रॅक्टरसह कर्मचारी पाठविणाऱ्या न. प. मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी लोकनेते नामदेवराव गडपल्लीवार, राजेंद्र गडपल्लीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी राजेंद्र गडपल्लीवार म्हणाले, माझे वडील नामदेवराव गडपल्लीवार यांनी नक्षल्यांविरोधात काढलेल्या पोलीस विभागाच्या शांतीयात्रेत सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर नक्षल्यांनी आमचे मूळ गावातील घर जाळून टाकले. शेतजमिन नागरिकांना वाटप करून दिली. त्यानंतर जीवाच्या भीतीपोटी आम्ही गडचिरोली येथे राहण्यासाठी आलो. नक्षलपीडित कुटुंब म्हणून आम्हाला तत्कालिन जिल्हाधिकारी निरंजनकुमार सुधांशू यांनी २००७ मध्ये गडचिरोली येथे डोंगरे पेट्रोलपंपालगतची सर्वे नं. ८२९/१ ही जागा वास्तव्यासाठी तात्पूरत्या स्वरूपात दिली. सन २००९ पासून आमच्या कुटुंबाचे या जागेवर वास्तव्य आहे. या जागेवर कोणाचेही अतिक्रमण होणार नाही, असे हमीपत्रही वडील नामदेवराव गडपल्लीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहून दिले आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)