स्वच्छता अभियानासाठी कृती महत्त्वाची
By Admin | Updated: January 30, 2016 01:59 IST2016-01-30T01:59:39+5:302016-01-30T01:59:39+5:30
संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी देशातील प्रत्येक नागरिकाने प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे आहे.

स्वच्छता अभियानासाठी कृती महत्त्वाची
आरमोरीत लोक माहिती अभियान : जनसामान्यांच्या मेळाव्यात चंदू मारकवार यांचे प्रतिपादन
आरमोरी : संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी देशातील प्रत्येक नागरिकाने प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे आहे. शासन काय करते? असा सवाल करण्यापेक्षा मी स्वत: देशासाठी, माझ्या गावासाठी काय करतो, याचे आत्मपरिक्षण करावे, स्वच्छता अभियानाच्या यशासाठी प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील राजगड गावचे उपसरपंच चंदूजी मारकवार यांनी शुक्रवारी केले.
आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या सभागृहात लोक माहिती अभियानांतर्गत आयोजित व्याख्यान कार्यक्रमात मारकवार बोलत होते. सरपंच, ग्रा. पं. सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल व जनसामान्यांच्या मेळाव्याला कृषी अधिकारी अभिजीत धडे, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक सुनील पाटील, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) एस. आर. धनकर, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डी. के. बारापात्रे, नायब तहसीलदार डी. एस. नैताम, सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक संजय आर्वीकर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन सुरेश गांजरे यांनी केले. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांनी दिली योजनांची माहिती
व्याख्यान सत्रात अभिजीत धेडे यांनी मृदा आरोग्य पत्रिका, कृषी योजना, बी- बियाणे तयार करण्याची पद्धती, मातीचे परिक्षण याबाबत, सुनील पाटील यांनी पंतप्रधान जीवनज्योती योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना आदींची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून दिली. एस. आर. धनकर यांनी पंचायत क्षेत्र विस्तार कायदा, आदिवासींचे वनहक्क, भूहक्क, पेसा अंतर्गत ग्रामसभेचे महत्त्व, डी. के. बारापात्रे यांनी ग्रामीण जीवनज्योती योजना, इंदिरा आवास योजना, मागासक्षेत्र अनुदान योजना डी. एस. नैताम यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेची माहिती दिली.