बोरकर यांच्यावरील कारवाई अन्यायपूर्ण
By Admin | Updated: May 11, 2017 01:53 IST2017-05-11T01:53:55+5:302017-05-11T01:53:55+5:30
गर्भवती महिलेच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याने बाळ दगावल्याच्या प्रकरणात प्रसूती तज्ज्ञ डॉ. प्रवीण किलनाके यांना निलंबित करण्यात आले.

बोरकर यांच्यावरील कारवाई अन्यायपूर्ण
निलंबन मागे घेण्याची मागणी : बीआरएसपीचा आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गर्भवती महिलेच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याने बाळ दगावल्याच्या प्रकरणात प्रसूती तज्ज्ञ डॉ. प्रवीण किलनाके यांना निलंबित करण्यात आले. दोषीला शिक्षा होणे सहाजीकच आहे. मात्र सदर प्रकरणात विनाकारण डॉ. उज्ज्वला बोरकर यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला. डॉ. बोरकर यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रूजू आदेश द्यावे, अन्यथा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला आहे.
बन्सोड यांनी म्हटले आहे की, अहेरी येथील गर्भवती महिला शमीम सुलतान शेख हिला २२ डिसेंबर २०१६ रोजी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती करण्यात आले. मात्र प्रसूतीतज्ज्ञ डॉ. प्रवीण किलनाके यांनी हेतुपुरस्सर गर्भवती महिलेच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे २५ डिसेंबरला प्रसूतीदरम्यान बाळ दगावल्याचा आरोप मुस्लिम वेल्फेअर सोसायटीने केला. चौकशीअंती डॉ. प्रवीण किलनाके यांना निलंबित करण्यात आले. दोषीला शिक्षा होणे साहजीकच आहे. मात्र डॉ. उज्ज्वला बोरकर यांना सदर प्रकरणात विनाकारण निलंबित करण्यात आले यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या पाठपुराव्यामुळे बाळ दगावल्याच्या प्रकरणाच्या बातम्या वृत्तपत्रात धडकल्या. मात्र कुठेही डॉ. उज्ज्वला बोरकर यांचा या प्रकरणासंदर्भात उल्लेख नव्हता. विभागीय चौकशी समितीच्या सदस्यांनी चौकशीदरम्यान डॉ. उज्ज्वला बोरकर यांना काहीच न विचारता चौकशी अहवालात वारंवार डॉ. उज्ज्वला बोरकर यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे आरोग्य सचिवालयाने डॉ. उज्ज्वला बोरकर यांनासुद्धा सहा महिन्यांसाठी निलंबित करून त्यांच्यावर अन्याय केला आहे, असे बन्सोड यांनी म्हटले आहे.
डॉ. जामी मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी बीआरएसपीने केली आहे.
बाळ दगावले प्रकरणाची चौकशी विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी केली. या समितीच्या अहवालावरून शासनाने डॉ. प्रवीण किलनाके यांच्यासह डॉ. उज्ज्वला बोरकर यांना निलंबित केले. चौकशी व कारवाईबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कुठलाही संबंध नाही.
- डॉ. प्रमोद खंडाते,
जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली