संविधानाचे तत्त्व ग्रहण करा
By Admin | Updated: November 30, 2015 01:22 IST2015-11-30T01:22:29+5:302015-11-30T01:22:29+5:30
समता, स्वातंत्र, न्याय, बंधुता, करूणा, मैत्री, प्रेम हे तथागत गौतम बुद्ध यांचे तत्त्वज्ञान बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारित भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले.

संविधानाचे तत्त्व ग्रहण करा
बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण : खोब्रागडे यांचे प्रतिपादन
आरमोरी : समता, स्वातंत्र, न्याय, बंधुता, करूणा, मैत्री, प्रेम हे तथागत गौतम बुद्ध यांचे तत्त्वज्ञान बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारित भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. देशातील लोकांच्या न्याय, हक्कासाठी संविधान असून संविधानाचे पावित्र टिकवून ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. ज्या दिवशी संविधानाचे आचरण व पालन प्रत्येक नागरिक करेल त्या दिवशी देश महासत्ता होईल, त्यामुळे संविधानाचे तत्त्व सर्वांनी ग्रहण करून ते आचरणात आणावे, असे आवाहन माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले.
आरमोरी येथे रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाच्या वतीने तथागत बुद्ध विहारात उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण नागपूर येथील भंते धम्मसारथी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी स्मारक मंडळाचे अध्यक्ष यशवंत जांभुळकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. क्रिष्णा गजबे, संघमित्रा ढोके, अॅड. कविता मोहरकर, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, मदन मेश्राम उपस्थित होते.
यावेळी भंते धम्मसारथी यांनी, धम्माच्या तत्त्वाचे घराघरात पालन करणे आवश्यक आहे. धम्मात अंधश्रद्धा घुसविणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन केले. प्रास्ताविक किशोर सहारे, संचालन पूनम दुर्याेधन यांनी तर आभार रमेश सोरदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी स्मारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)