विज्ञान अंगिकारून अंधश्रध्दा दूर सारा
By Admin | Updated: December 20, 2014 22:38 IST2014-12-20T22:38:21+5:302014-12-20T22:38:21+5:30
जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात विज्ञानाचा प्रसार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात भूकबळी, कुपोषण, दारिद्र्य आदी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांनीच विज्ञानाचा

विज्ञान अंगिकारून अंधश्रध्दा दूर सारा
विज्ञान, तंत्रज्ञानावर व्याख्यान : अभय बंग यांचे आवाहन
गडचिरोली : जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात विज्ञानाचा प्रसार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात भूकबळी, कुपोषण, दारिद्र्य आदी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांनीच विज्ञानाचा अंगिकार करून अंधश्रध्देला दूर सारावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.
कारमेल हायस्कूलमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी ‘समावेशक विकासासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. निखील जोशी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपशिक्षणाधिकारी निकम आदी उपस्थित होते. देशात व राज्यात गडचिरोलीची वाईट जिल्हा म्हणून ओळख आहे. त्यामुळे या जिल्ह्याविषयी इतर जिल्ह्यात गैरसमज आहे. असे असले तरी हिरवळ, जल, हवा, सुंदर माणसं आदींनी श्रीमंत जिल्हा आहे. मात्र अतिमागास व नक्षलग्रस्त असल्याने शासनही अधिकारी, कर्मचाऱ्यांना धाक दाखवून या जिल्ह्यात ‘पनिशमेंट’ म्हणून सेवा देण्यास पाठवित आहेत. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक क्रांती घडवून आणल्यास जिल्ह्याचा विकास झपाट्याने होईल. प्रत्येकास विज्ञानाविषयी आवड असली पाहिजे. तेव्हाच जिल्ह्यातील प्रत्येकापर्यंत विज्ञान पोहचून जिल्हा विकासाचा मार्ग सुकर होईल. प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे. मनामध्ये प्रश्न निर्माण होणे ही विज्ञानाची सुरुवात आहे. जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात विज्ञानाचा प्रसार झाला नाही. म्हणून जिल्ह्यात अंधश्रध्दा दिसून येत आहे. त्यामुळे कुपोषण, भूकबळी, साथीचे आजार आदी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पूर्वीच्या काळात अंधश्रध्देपोटी धान पिकाचे उत्पादन जास्तीचे होते असा समज होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नरबळी दिला जात होता. आता यात बदल झाला असून हा बदल विज्ञानामुळेच झाल्याचे डॉ. अभय बंग यांनी सांगितले. विज्ञान म्हणजे नवे संशोधन असे सांगत लपलेले उघडून काढणे हे विज्ञान आहे. जीवनात विज्ञान येईल तेव्हाच विषमता दूर होईल, असेही डॉ. अभय बंग म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समायोचित मार्गदर्शन केले.
संचालन व आभार विज्ञान पर्यवेक्षक खराटे यांनी केले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकवृंद उपस्थित होते.
(स्थानिक प्रतिनिधी)