बोगस शिक्षक बदली प्रकरणातील आरोपींना जामीन
By Admin | Updated: October 14, 2016 01:48 IST2016-10-14T01:48:48+5:302016-10-14T01:48:48+5:30
बोगस शिक्षक बदली प्रकरणातील आरोपी प्रमोद सहारे, विनोद अल्लुरवार व सुनील लोखंडे या तिघांनाही जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

बोगस शिक्षक बदली प्रकरणातील आरोपींना जामीन
निलंबित करण्यास विलंब : नितीन भोलेला १८ पर्यंत पीसीआर
गडचिरोली : बोगस शिक्षक बदली प्रकरणातील आरोपी प्रमोद सहारे, विनोद अल्लुरवार व सुनील लोखंडे या तिघांनाही जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची बनावट स्वाक्षरी करणाऱ्या जलस्वराज्य प्रकल्पातील नितीन भोले याला १८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जिल्ह्यात सध्या बोगस शिक्षकांची बदली प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात आजपर्यंत सहा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांची आता जामिनावर सुटका झाली आहे. अटक झाल्याला १५ ते २० दिवसांचा कालावधी उलटला आहे. अटक झालेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई म्हणून त्याला निलंबित केले जाते. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आजपर्यंत केवळ रूपेश शेडमाके या एकाच आरोपीला निलंबित केले आहे. उर्वरित पाच कर्मचाऱ्यांच्या निलंबनास उशिर होत आहे. इतर पाचही कर्मचारी या प्रकरणात दोषी आहेत. त्यामुळे याही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
बोगस शिक्षक बदली प्रकरणात जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विश्वास भोवते यांनी गडचिरोली जिल्हा न्यायलयात अंतरिम जामीनसाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन नामंजूर केला. विश्वास भोवते हे फरार असल्याची चर्चा आहे. भोवते यांचा जामीन नामंजूर झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. जिल्हा न्यायालयाने अंतरिम जामीन नामंजूर केल्याने विश्वास भोवते हे उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)