लेखा-मेंढा गावात वाद पेटला
By Admin | Updated: October 8, 2015 00:52 IST2015-10-08T00:52:17+5:302015-10-08T00:52:17+5:30
बांबू वनहक्क मिळालेले देशातील पहिले गाव म्हणून प्रसिध्दीला आलेल्या मेंढालेखा गावात आता प्रचंड वाद उफाळून आला आहे.

लेखा-मेंढा गावात वाद पेटला
कारवाई : २४ शेतकऱ्यांचे अतिक्रमणातील ३० नांगर, कुऱ्हाड जप्त
धानोरा : बांबू वनहक्क मिळालेले देशातील पहिले गाव म्हणून प्रसिध्दीला आलेल्या मेंढालेखा गावात आता प्रचंड वाद उफाळून आला आहे.
मागील सहा महिन्यांपासून लेखावासीयांना मेंढावासीयांनी मेंढा जंगल परिसरात प्रवेश नाकारल्याने लेखावासीय त्रस्त झाले आहे. लेखा हद्दीत कक्ष क्रमांक ५१०, ५१२ मध्ये मेंढा येथील २४ शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून शेती कसणे सुरू केले होते. त्या ठिकाणी असलेले तीन नांगर, तीन कुऱ्हाडी, पावडे, टिकास, वांगे मिरचीचे रोप बुधवारी जप्त करण्याची कारवाई लेखावासीयांकडून करण्यात आली. त्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. सुमारे ७० ते ८० एकर जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात आले. लेखा येथील वन हक्क समितीने ३१ मे २०१५, २० जून २०१५ व ३१ जून २०१५ रोजी नोटीसा पाठवून लेखा गावाला जंगलाचे क्षेत्र व चराई क्षेत्र कमी असल्याने त्या जागेवर वृक्ष लागवड, गुरे चारण्याकरिता आवश्यकता आहे. त्यामुळे मेंढावासीयांनी केलेले अतिक्रमण खाली करण्याची मागणी केली होती. सदर नोटीसची माहिती वन विभाग व धानोरा तालुका दंडाधिकारी यांना देऊन अतिक्रमण हटविण्याची कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी सुमारे २५० महिला व पुरूषांनी कंपार्टमेंट नंबर ५१०, ५१२ मधील नांगर व इतर सामग्री जप्त केली. ती ट्रॅक्टरमध्ये भरून धानोरा वन कार्यालयात आणून जमा करण्यात आली. सदर कारवाईचे पत्र पोलीस स्टेशन, वन विभाग यांनाही पाठविण्यात आले. ही कारवाई वनहक्क समितीचे सदस्य रामचंद्र जेनू राऊत, विनोद विठ्ठल लेनगुरे, रमेश रामचंद्र सोनुले, महागू जोगी उईके, साधुराम चैतू मडावी, चिनू नवलू दुगा, मधुकर रैजी तिरंगे, सुनीता झंझाळ, ताराबाई मैन, लता वाढई, कुंदा लेनगुरे, चंद्रभागा कोसरे, सुरेश वाढई यांच्या पुढाकाराने पार पाडण्यात आली. यापूर्वी ६ जुलै २०१५ ला वन हक्क समितीने लेखा येथील २४ शेतकऱ्यांचे दावे नाकारून तसा अहवाल धानोरा तहसीलदाराकडे पाठविला होता. त्यात मेंढावासीयांकडे स्वत:ची जमीन उपलब्ध आहे व लेखा येथील रहिवासी नसल्याने त्यांचा हक्क नाकारण्यात आला व ४० ग्रामवासीय भूमीहिन असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, मेंढाच्या २४ शेतकऱ्यांनी पट्टे देण्यासाठी वन हक्क समितीकडे अर्ज दिले आहे. ते पट्टे फेटाळता येत नाही, असे सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी म्हटले आहे. एकूणच लेखा-मेंढा गावातील वाद आता चव्हाट्यावर आला असून श्रीमंत गाव म्हणून गणना होणाऱ्या या गावात आता वाद वाढले आहेत. (तालुका प्रतिनिधी)