रामंजापूर फाट्यावर अपघात टाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:02 IST2018-04-04T23:02:37+5:302018-04-04T23:02:37+5:30
येथून पाच किमी अंतरावरील राष्ट्रीय महामार्ग ६३ वर रामंजापूर फाट्याजवळ १ एप्रिल रोजी अपघात होऊन यामध्ये एक जण जागीच ठार झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले.

रामंजापूर फाट्यावर अपघात टाळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : येथून पाच किमी अंतरावरील राष्ट्रीय महामार्ग ६३ वर रामंजापूर फाट्याजवळ १ एप्रिल रोजी अपघात होऊन यामध्ये एक जण जागीच ठार झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. या अपघाताची दखल घेत बांधकाम विभागाने या ठिकाणी गतिरोधक बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
सिरोंचा-अंकिसा मार्गावरील रामंजापूर फाट्याजवळचा परिसर अपघात प्रवनस्थळ मानला जातो. या फाट्यावर नेहमीच अपघात घडतात. विशेष म्हणजे समोर वळण आहे. त्यामुळे दूरवरून येणारे वाहन नजरेस पडत नाही. त्यामुळे या ठिकाणी वर्षातून अनेकदा अपघात होतात. १ एप्रिल रोजी झालेला अपघात अतिशय भयंकर होता. या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला. तर त्याची पत्नी व पुतण्या गंभीर जखमी झाले. दुचाकीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या ठिकाणी गतिरोधक नसल्याने मुख्य मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनांची गती कमी होत नाही. त्याचबरोबर फाट्याकडून मार्गाकडे येणाऱ्या व्यक्तीचेही लक्ष राहत नाही. परिणामी या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले होते. १ एप्रिलच्या अपघातानंतर या ठिकाणी गतिरोधक बांधण्याची मागणी नागरिकांकडून होण्यास सुरुवात झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या मागणीची दखल घेत या ठिकाणी गतिरोधक बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. वाहनांच्या गतीवर नियंत्रण मिळून अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.