रस्त्यावरील उभ्या ट्रकांमुळे अपघाताचा धोका
By Admin | Updated: August 22, 2016 02:17 IST2016-08-22T02:17:12+5:302016-08-22T02:17:12+5:30
आरमोरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढली आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

रस्त्यावरील उभ्या ट्रकांमुळे अपघाताचा धोका
रस्ते झाले अरूंद : आरटीओ व पोलिसांचे हात वर
आरमोरी : आरमोरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढली आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. देसाईगंज मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ राहते. मात्र बर्डी टी-पार्इंट, महात्मा गांधी महाविद्यालयासमोरील पेट्रोल पंपाच्या परिसरात देसाईगंज मार्गावर दोन्ही बाजुला मोठ्या संख्येने ट्रक उभ्या केले जातात. तासणतास सदर वाहने अशीच उभी राहत असल्याने आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. या ठिकाणी अपघाताची शक्यता वाढली आहे.
गडचिरोली जिल्ह्यालगत असलेल्या भंडारा, गोंदिया यासह छत्तीसगड राज्यातून देसाईगंज, आरमोरीकडे दररोज अनेक ओव्हरलोड ट्रक येतात. जड वाहनाची वाहतूक करणाऱ्या या ट्रक आरमोरी येथील बर्डी टी-पार्इंट ते पेट्रोलपंपापर्यंत उभ्या केल्या जातात. रस्त्याच्या दोन्ही कडेला ट्रकांची मोठी रांग लागत असल्याने दुचाकी वाहनधारकांना मोठ्या जिकरीने येथून वाहने पुढे न्यावी लागतात. या साऱ्या गंभीर प्रकाराकडे उपप्रादेशिक परिवहन विभागासह पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर उभ्या करणाऱ्या ट्रक चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी आरमोरी शहरातील नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)