विकासासाठी लोकशाहीचा मार्ग स्वीकारा-मुख्यमंत्री

By Admin | Updated: February 26, 2016 01:47 IST2016-02-26T01:47:47+5:302016-02-26T01:47:47+5:30

देशात व महाराष्ट्रात लोकशाही असल्याने मी अतिदुर्गम संवेदनशील बुर्गी या गावात पोहोचलो. लोकशाही प्रणालीतून देशाचा विकास होतो.

Accept the path of democracy for development- Chief Minister | विकासासाठी लोकशाहीचा मार्ग स्वीकारा-मुख्यमंत्री

विकासासाठी लोकशाहीचा मार्ग स्वीकारा-मुख्यमंत्री

नागरिकांशी संवाद : दुर्गम व संवेदनशील भागातील बुर्गी पोलीस ठाण्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
एटापल्ली : देशात व महाराष्ट्रात लोकशाही असल्याने मी अतिदुर्गम संवेदनशील बुर्गी या गावात पोहोचलो. लोकशाही प्रणालीतून देशाचा विकास होतो. त्यामुळे चुकीचा मार्ग सोडून लोकशाहीवर विश्वास ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात या, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
एटापल्लीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या बुर्गी येथील पोलीस मदत केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे वित्त,नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरिक्षक शिवाजी बोडखे, जिल्हाधिकारी रणजितकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्राणहिता मुख्यालयाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अहेरीचे एसडीओ राममूर्ती, एटापल्लीचे एसडीपीओ नितीन जाधव आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एटापल्ली या दुर्गम भागाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. विकास कामे पूर्ण होण्यासाठी कायदा व सुव्यवस्था चांगली असली पाहिजे, त्या दृष्टीने पोलीस विभागाला सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरिक्षक पुरूषोत्तम चाटे तर आभार बुर्गीचे ठाणेदार दशरथ तलेदवार यांनी मानले. यावेळी भगवंतराव आश्रमशाळा बुर्गीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर रेला नृत्य सादर केले. तीन हेलीपॅड उतरण्याची व्यवस्था कार्यक्रमस्थळी करण्यात आली होती. सकाळी १० वाजतापासून कार्यक्रमस्थळावर हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी आलेत. दोन हेलिकॉप्टर यावेळी सोबत होते. दुर्गम भागात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी या भागात काम करणाऱ्या पोलीस जवान व अधिकाऱ्यांचे मुक्तकंठाने कौतुक केले.

Web Title: Accept the path of democracy for development- Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.