शेती साहित्य तयार करण्याची शेतकऱ्यांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:41+5:302021-06-22T04:24:41+5:30
पूर्वी शेतीशी निगडित बारा बलुतेदारांना दान स्वरूपात त्यांचा मोबदला दिला जात होता यातून बलुतेदारांना आपला उदरनिर्वाह करता येत होता ...

शेती साहित्य तयार करण्याची शेतकऱ्यांची लगबग
पूर्वी शेतीशी निगडित बारा बलुतेदारांना दान स्वरूपात त्यांचा मोबदला दिला जात होता यातून बलुतेदारांना आपला उदरनिर्वाह करता येत होता मात्र बदलत्या काळानुसार दान स्वरूपात केले जाणारे काम बंद होण्याच्या मार्गावर असून आता बलुतेदार पैशांच्या स्वरूपात मोबदला घेत आहेत. शेतातील नांगरणी, वखरणी करण्यासाठी लागणारे नांगर, वखार, तिफण या प्रमुख साहित्यासह इतर किरकोळ साहित्य शेतकरी तयार करवून घेत असतात. पारंपरिक साधने शेती कामात टिकवून ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी जीवाचे रान करीत ते साहित्य तयार करीत असतात. मात्र दान स्वरूपात चालणारे व्यवसाय बंद करून सध्या पैशांच्या स्वरूपात काम केले जात असल्याचे सुतार व लोहारांनी सांगितले.
दरवर्षी शेतकरी शेती मशागत कामासाठी लागणारे साहित्य तयार करीत असतात. या साहित्याची जोपासना करणे गरजेचे आहे. तरी पण शेतकरी दरवर्षी किमान नांगर व वखर या दोन प्रमुख साधनांची दुरुस्ती करावी लागत असते. या कामातून सुतार व लोहार बांधवांना व वर्षातून किमान दोन ते तीन महिने रोजगार उपलब्ध होत असतो. हा व्यवसाय करणारे काही गावांमध्ये मोजकेच कारागीर शिल्लक उरले आहेत. पिढीजात व्यवसाय करण्यासाठी आजचा युवक तयार नसल्याने केवळ बोटावर मोजण्याइतके कारागीर शिल्लक आहेत. काही शेतकरी कारागिराकडे साहित्य तयार करवून घेण्यासाठी मनधरणी करीत आहेत तर काही शेतकरी लोखंडी साहित्य वापरताना दिसून येत आहेत.
बाॅक्स
एका नांगराला माेजावे लागतात ७०० ते ८०० रुपये
लाकूड मिळणे कठीण झाले असल्याने लोखंडी नांगर, वखर सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. तरी पण काही शेतकरी लाकडी साहित्य टिकवून ठेवत आहेत. एक नांगर तयार करण्यासाठी साधारण ७०० ते ८०० रुपये शेतकऱ्यांना सुतारांना मोजावे लागत आहे. यातून लोहार व सुतार कारागिरांना हंगामी स्वरूपात रोजगार उपलब्ध झाला असून सुतार, लोहार बांधवांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत.
===Photopath===
210621\img-20210621-wa0160.jpg
===Caption===
शेतीचे साहित्य तयार करण्याची लगबग फोटो