दुर्लक्षितांचे प्रश्न मांडण्याची ताकद वर्तमानपत्रातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 01:27 IST2016-04-07T01:27:37+5:302016-04-07T01:27:37+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार होते. त्यांनी चळवळ उभारताना वृत्तपत्राद्वारे समाजात जागृती निर्माण करून जनतेची चळवळ उभी केली.

दुर्लक्षितांचे प्रश्न मांडण्याची ताकद वर्तमानपत्रातच
सामाजिक न्याय वर्षानिमित्त कार्यक्रम : रोहिदास राऊत यांचे प्रतिपादन
गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार होते. त्यांनी चळवळ उभारताना वृत्तपत्राद्वारे समाजात जागृती निर्माण करून जनतेची चळवळ उभी केली. शोषित, पीडित व दुर्लक्षित समाजाचे प्रश्न मांडण्याची व त्यांना न्याय मिळवून देण्याची ताकद वृत्तपत्रांमध्येच आहे, त्यामुळे बाबासाहेबांच्या विचाराचा व तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करून प्रसारमाध्यमांनी काम केल्यास समाजाला न्याय मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करीत आहे. त्याअंतर्गत गडचिरोली येथे पत्रकारांची कार्यशाळा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. बी. पी. नागदेवे, नितीन रामटेके, सोनटक्के, डॉ. सुरेश खंगार, मनोज भैसारे, कोमल खोब्रागडे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रोहिदास राऊत म्हणाले की, पत्रकारिता ही समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक म्हणजेच पर्यायाने सर्वांगिक उन्नतीसाठी आहे.
प्रा. कोमल खोब्रागडे, नितीन रामटेके, प्रा. सोनटक्के यांनी संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी १०० टक्के व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून समाजाने बाबासाहेबांचे विचार अंगिकारल्याशिवाय प्रगती शक्य नाही, तेव्हा त्यांचे प्रगल्भ ज्ञानभंडार वाचून समाज परिवर्तन घडवून आणावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक दीपक सोरदे यांनी तर आभार शिवाजी पाटील यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)