भाजपच्या उमेदवारी यादीत जुन्या निष्ठावानांसह आयारामांनाही स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2017 01:14 IST2017-02-03T01:14:53+5:302017-02-03T01:14:53+5:30
जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पक्षासाठी काम करणाऱ्या नाना उर्फ कोदंडधारी धनंजय नाकाडे यांना

भाजपच्या उमेदवारी यादीत जुन्या निष्ठावानांसह आयारामांनाही स्थान
गडचिरोली : जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पक्षासाठी काम करणाऱ्या नाना उर्फ कोदंडधारी धनंजय नाकाडे यांना भारतीय जनता पक्षाने विसोरा-सावंगी जि.प. गणातून उमेदवारी देऊन जुन्या कार्यकर्त्यांनाही स्थान दिला आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसे, शिवसेना पक्षातूनही भाजपात प्रवेश केलेल्या अनेक नव्या लोकांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश करणारे अरूण केवलराम हरडे यांना पेंढरी-गट्टा येथून तर काँग्रेसमधून भाजपात आलेले प्रकाश महाराज काटेंगे यांना येरकड- रांगी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती राहिलेले रमाकांत नामदेव ठेंगरी यांनाही भाजपने कोरेगाव-डोंगरगाव (हलबी) येथून उमेदवारी दिली आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणूक लढणाऱ्या मिना विलास कोडाप यांना हळदवाही-रेगडी जि.प. क्षेत्रातून उमेदवारी दिली आहे. याशिवाय भाजपने पंचायत समिती गणातही अनेक नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. पक्षासाठी गेले अनेक वर्ष काम करणारे मुलचेरा तालुका भाजप अध्यक्ष प्रकाश दत्ता यांच्या पत्नी विशाखा दत्ता यांना कालिनगर-पंचायत समिती गणातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या पं.स. सदस्य असलेल्या व भाजपात प्रवेश केलेल्या अमिता मडावी यांना कोटगल येथून पक्षाने उमेदवारी दिली आहे. खासदार अशोक नेते यांच्या अत्यंत विश्वासातील महिला पदाधिकारी रेखा डोळस यांनाही मुडझा-येवली जिल्हा परिषद गणातून उमेदवारी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेले मारोतराव इचोडकर यांनाही पक्षाने मुरखळा पं.स. गणातून उमेदवारी दिली आहे. भाजपचे कुरखेडा तालुका अध्यक्ष राम लांजेवार यांना पुराडा पं.स. गणातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक शशिकांत विठ्ठलराव साळवे यांनाही पक्षाने चातगाव-कारवाफा क्षेत्रातून उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले रमेश बारसागडे यांनाही पक्षाने कुनघाडा रै-तळोधी जि.प. गणातून उमेदवारी दिली आहे. चामोर्शी तालुक्यातील कुख्यात दारू विक्रेते धर्मराज रॉय यांच्या पत्नी शिल्पा रॉय यांनाही दुर्गापूर-वायगाव जिल्हा परिषद गणातून भाजपने उमेदवारी दिली आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या ३५ जिल्हा परिषद व ७० पंचायत समिती गणातील उमेदवारांची भाजपची पहिली यादी गुरूवारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.