तेंदूपाने तोडणारी महिला वाघाच्या हल्ल्यात ठार
By गेापाल लाजुरकर | Updated: May 14, 2024 12:15 IST2024-05-14T11:33:18+5:302024-05-14T12:15:22+5:30
गडचिरोली तालुक्यातील घटना

A woman was killed in a tiger attack
गडचिरोली : तीन महिलांसोबत तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने झडप घालून हल्ला केला. यात महिला जागीच ठार झाली. ही घटना गडचिरोली तालुक्यातील सावरगाव जंगल परिसरात मंगळवार सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली.
पार्वताबाई बालाजी पाल (६५) रा. आंबेशिवणी ता. गडचिरोली असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पार्वताबाई ही तीन महिलांसोबत आंबेशिवणीजवळची कठाणी नदी ओलांडून सावरगावच्या जंगलात तेंदूपाने संकलनासाठी गेली होती. गावापासून जवळपास ४ कि.मी. हे अंतर आहे. तेंदूपाने संकलनाच्या कामात व्यस्त असतानाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने पार्वताबाई यांच्यावर हल्ला केला व फरफटत घनदाट जंगलाच्या दिशेने नेले. दरम्यान महिला किंचाळल्या व त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा परिसरात तेंदूपाने गोळा करणारे मजूर गोळा झाले. तोपर्यंत वाघ १०० ते १२५ मीटर अंतर पार्वताबाईला फरफटत घेऊन गेला. काही वेळाने बरेच मजूर गोळा झाले व आरडाओरड केल्याने वाघ घटनास्थळावरून पसार झाला. परंतु तोपर्यंत पार्वताबाई गतप्राण झाली. काही वेळाने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हा परिसर चातगाव वनपरिक्षेत्रात येतो. पार्वताबाई यांच्या मुलाचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून सून व नातू वेगळे राहत होते तर पार्वताबाई ही पती बालाजी पाल यांच्यासोबत राहत होती. त्यांच्यापश्चात पती, विवाहित मुलगी, सून व नातवंडे आहेत.