रानटी हत्तींच्या कळपाचा पिकांमध्ये हैदौस; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
By गेापाल लाजुरकर | Updated: August 13, 2023 19:57 IST2023-08-13T19:57:47+5:302023-08-13T19:57:59+5:30
कळपात नव्या पिल्लूचे आगमन झाल्याने कळपाने या भागात मुक्काम ठाेकला आहे. सध्या कळपात १८ हत्ती आहेत.

रानटी हत्तींच्या कळपाचा पिकांमध्ये हैदौस; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
गडचिरोली : कोरची व कुरखेडा तालुक्यात जुलै महिन्यात हैदोस माजवणाऱ्या रानटी हत्तींच्या कळपाने २ ऑगस्ट रोजी देलनवाडी वन परिक्षेत्रात प्रवेश करून आतापर्यंत पिकांचे नुकसान केले आहे. नुकसानीची ही मालिका सुरूच असून सध्या उराडी, सोनसरी व कुलकुली परिसरात हत्तींचा वावर आहे. विशेष म्हणजे, कळपात नव्या पिल्लूचे आगमन झाल्याने कळपाने या भागात मुक्काम ठाेकला आहे. सध्या कळपात १८ हत्ती आहेत.
जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, देसाईगंज आदी तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून रानटी हत्तींचा कळप येऊन विविध पिकांची नासधूस व घरांचीही पाडापाडी करीत आहे. सध्या या भागात धानाचे पीक आहे. रानटी हत्ती या भागात वावरत असून ते आणखी किती दिवस धानासह विविध पिकांचे नुकसान करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
मुक्काम का वाढला ?
रानटी हत्तींचा वावर गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. परंतु ते एकाच ठिकाणी राहत नाही. अधूनमधून छत्तीसगड राज्यातही ये-जा करीत असतात. देलनवाडी वन परिक्षेत्रात हत्तीच्या कळपाने २ ऑगस्ट रोजी प्रवेश केला; परंतु अद्यापही ते याच भागात वावरत आहेत. आरमाेरी व कुरखेडा तालुक्यात त्यांचा वावर आहे. कळपात एका मादी हत्तिणींने पिल्याला जन्म दिला त्यामुळे हत्तींची भ्रमंती कमी झाली. परिणामी ते जास्त फिरत नसल्याचे, देलनवाडीचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय मेहेर यांनी सांगितले.
कुरखेडा व आरमोरी तालुक्यातील पिकांचे नुकसान
रानटी हत्तींच्या कळपाने शनिवार १२ ऑगस्ट रोजी कुरखेडा तालुक्यातील उराडी व सोनसरी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले. उराडी येथील चार व सोनसरी येथील ५ शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस हत्तींनी केली. यापूर्वी पुराडा परिसरत मोहझरी परिसर ठाणेगाव परिसरातील पिकांची नासधूस हत्तींच्या कळपाने केली होती. सध्या जंगल व शेतशिवारात ह्या हत्तींचा वावर राहत असून या हत्तींपासून शेतकऱ्यांनाही धोका आहे.