१५ व्यक्तींसह ९२ जनावरे दगावली
By Admin | Updated: September 18, 2016 01:46 IST2016-09-18T01:46:28+5:302016-09-18T01:46:28+5:30
गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१६ या साडेपाच महिन्याच्या कालावधीत वीज कोसळून,

१५ व्यक्तींसह ९२ जनावरे दगावली
नैसर्गिक आपत्तीचा फटका : २ हजार ४३५ घरांची पडझड
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१६ या साडेपाच महिन्याच्या कालावधीत वीज कोसळून, अतिवृष्टी तसेच पुरात अडकून व इतर प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे १५ व्यक्तींसह लहान व मोठी मिळून एकूण ९२ जनावरे दगावली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. याशिवाय अतिवृष्टीमुळे यंदाच्या पावसाळ्यात २ हजार ४३५ घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब बेघर झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात तीन ते चारदा अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली. गेल्या तीन वर्षातील पावसाची सरासरी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधार पावसाने पूर्ण झाली. अतिवृष्टी व इतर आपत्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले.
नैसर्गिक आपत्तीमुळे १५ इसम ठार झाले. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील दोन, धानोरा एक, कोरची एक, कुरखेडा दोन, आरमोरी एक, चामोर्शी एक, अहेरी एक, सिरोंचा दोन व एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक चार इसमांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा आतापर्यंत ११ इसम जखमी झाले आहेत. यामध्ये चामोर्शी तालुक्यातील दोन, मुलचेरा दोन व अहेरी तालुक्यातील सर्वाधिक पाच इसमांचा समावेश आहे.
नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत २४ लहान जनावरे दगावली आहेत. यामध्ये कुरखेडा तालुक्यातील तीन, आरमोरी एक, अहेरी सहा, एटापल्ली नऊ व सिरोंचा तालुक्यातील पाच जनावरांचा समावेश आहे. दगावलेल्या ६८ मोठ्या जनावरांमध्ये धानोरा तालुक्यातील चार, गडचिरोली चार, कुरखेडा तीन, आरमोरी चार, चामोर्शी दोन, अहेरी १५, भामरागड सात, सिरोंचा पाच व सर्वाधिक एटापल्ली तालुक्यातील २४ जनावरांचा समावेश आहे.
अतिवृष्टीमुळे यावर्षी आतापर्यंत बाराही तालुक्यात एकूण २ हजार ४२० घरांची अशंता पडझड झाली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील २६१, धानोरा १७८, कोरची २७, कुरखेडा १२८, देसाईगंज १६, आरमोरी ५२०, चामोर्शी ७१९, मुलचेरा १२, अहेरी ४१५, एटापल्ली ७२, भामरागड ४ व सिरोंचा तालुक्यातील ६८ घरांचा समावेश आहे. पूर्णत: पडझड झालेल्या १५ घरांमध्ये गडचिरोली तालुक्यातील चार, कुरखेडा एक, अहेरी एक व एटापल्ली तालुक्यातील नऊ घरांचा समावेश आहे. आर्थिक मदत तत्काळ देण्याची मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
६९ लाखांची मदत प्रलंबित
अतिवृष्टी, पूर व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात यंदा आतापर्यंत नागरिकांचे एकूण ९६ कोटी ९८ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त परिस्थितीची पाहणी व मोकापंचनामा महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी केला असून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. या अहवालानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत पूर पीडित व नुकसानग्रस्तांना शासनाच्या निकषानुसार ९९ लाख ९८ हजार २९० रूपयांची मदत प्रदान करण्यात आली आहे. अद्यापही ६९ लाख ८८ हजार रूपयांची मदत देणे शिल्लक आहे. परिणामी अनेक नुकसानग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित आहे.
जनावरांचे ९४ गोठे कोसळले
अतिवृष्टीमुळे जिल्हाभरात आतापर्यंत शेतकऱ्यांच्या जनावरांचे एकूण ९४ गोठ्यांची पडझड झाली असून जनावर मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात जनावरांच्या निवासाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. यामुळे गडचिरोली तालुक्यातील १४, धानोरा १०, कोरची २, कुरखेडा ३०, वडसा १, आरमोरी २४, मुलचेरा १, अहेरी ८, भामरागड १ व सिरोंचा तालुक्यातील ३ गोठ्यांचा समावेश आहे.