९० हजारांची मोहफुलाची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:27+5:30
तालुक्यातील नडीकुडा या गावात मोठ्या प्रमाणात गुळाची व साखरेची दारू गाळून संपूर्ण सिरोंचा तालुक्यात त्याची तस्करी होते. गावातील बहुतेक घरी हातभट्ट्या आहेत. पेंटिपाका माल, पेंटिपाका चक आणि तुमनूर टोला ही गावे याच मार्गावर असल्याने या गावातही दारूची तस्करी होते. लॉकडाऊन असल्याने रात्रीला दारूची तस्करी वाढली आहे.

९० हजारांची मोहफुलाची दारू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : ट्रॅक्टरच्या ट्यूबमध्ये तसेच प्लॅस्टिक पन्नीमध्ये दारू भरून त्याची दुचाकीवरून रात्रीला तस्करी करीत असलेल्यांचा मुद्देमाल पेंटिपाका माल, पेंटिपाका चक आणि तुमनूर टोला येथील पोलीस पाटील आणि गावकऱ्यांनी पकडून नष्ट केला. यावेळी विक्रेते फरार झाले. दोन दुचाकीही गावकऱ्यांनी ताब्यात घेतल्या. रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. नडीकुडा या गावातून या दारूची तस्करी केली जात होती.
तालुक्यातील नडीकुडा या गावात मोठ्या प्रमाणात गुळाची व साखरेची दारू गाळून संपूर्ण सिरोंचा तालुक्यात त्याची तस्करी होते. गावातील बहुतेक घरी हातभट्ट्या आहेत. पेंटिपाका माल, पेंटिपाका चक आणि तुमनूर टोला ही गावे याच मार्गावर असल्याने या गावातही दारूची तस्करी होते. लॉकडाऊन असल्याने रात्रीला दारूची तस्करी वाढली आहे. रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती या तीन गावातील लोकांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस पाटलांना दिली.
तुमनूरचे पोलीस पाटील सुंकरी राजमल्लू, पेंटिपाका चेक चेकचे पोलीस पाटील सडवाली वेमुला, पेंटिपाका मालचे पोलीस पाटील सत्यनारायण नरहरी, सत्यम गोरा, सीनू सिरंगी, मनिष वेमुला, मणिकठा वेमुला, विशाल मच्चिडी, प्रणय मडे, किरण वेमुला, व्यंकटस्वामी सिरंगी आदी गावकºयांनी दारूची वाहतूक करणाऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. मध्यरात्री गावकरी गावाजवळ दबा धरून बसले. दुचाकीने काही जण दारू घेऊन येत असल्याचे लक्षात येताच सर्वांनी त्यांचा पाठलाग केला. ही बाब लक्षात येताच दोघांनी दारू व दुचाकी टाकून अंधारात पळ काढला तर एक जण दारू टाकून गाडीनेच पसार झाला. ट्रॅक्टरच्या ट्यूबमध्ये व प्लॅस्टिक पन्नीमध्ये भरलेली तब्बल ३५० लीटर दारू तीनही गावकºयांनी जप्त केली. ही दारू ९० हजार रुपयाची असल्याचे सांगण्यात आले.
पहाटे पोलीस पाटलांनी ही माहिती मुक्तिपथ तालुका चमूला दिली. मुक्तिपथ तालुका चमूने सिरोंचा पोलिसांना याची माहिती देत घटनास्थळ गाठले. पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे आणि मेजर मडावी यांनी सहकाºयांना घेऊन घटस्थळी धाव घेत गावकºयांचे कौतुक केले व सर्व मुद्देमाल नष्ट केला व दुचाकी ताब्यात घेतल्या.
पोटगाव व विसोरातही कारवाई
देसाईगंज : पोटगाव आणि विसोरा येथील हातभट्टीचालकांचा तब्बल १५ क्विंटल मोहसडवा पोलीस पाटील आणि मुक्तिपथ गावसंघटनांनी पकडून नष्ट केला. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. पोटगाव येथे एक महिला घरीच दारू गाळून त्याची विक्री करीत असल्याची माहिती गाव संघटनेला मिळाली. त्यांनी मुक्तिपथ चमुला याची माहिती दिली. गाव संघटनेच्या महिला, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच यांच्या मदतीने धाड टाकली असता घरी दारू विकली जात असल्याने निदर्शनास आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावातील युवकही गस्तीवर आहेत. हा प्रकार लक्षात येताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेत सर्वांनी मिळून परिसर पिंजून काढला असता चुंगड्ड्यांमध्ये लपवून ठेवलेला तब्बल ५०० किलो मोहसडवा सापडला. त्याचबरोबर दारू काढण्याचे साहित्यही सापडले. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेत तो नष्ट केला. देसाईगंजमधील काही लोक विसोरा येथे दारू पिण्यासाठी जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. युवकांनी त्यांचा पाठलाग करीत एका विक्रेत्याच्या घरी मुक्तिपथ गाव संघटनेचे कार्यकर्ते आणि तालुका चमू यांच्या सहकार्याने धाड टाकली असता तब्बल १० क्विंटल मोहसडवा सापडला.