वाहनासह नऊ लाखांचा दारूसाठा पकडला

By Admin | Updated: May 5, 2016 00:10 IST2016-05-05T00:10:19+5:302016-05-05T00:10:19+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष जिल्हा दारूबंदी पथकाच्या पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वैरागड ते कुरखेडा मार्गावर

9 lakhs of liquor was caught with the vehicle | वाहनासह नऊ लाखांचा दारूसाठा पकडला

वाहनासह नऊ लाखांचा दारूसाठा पकडला

पथकाची कारवाई : वैरागड-कुरखेडा मार्गावर घटना; पाच दारूविक्रेत्यांना अटक
आरमोरी : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष जिल्हा दारूबंदी पथकाच्या पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वैरागड ते कुरखेडा मार्गावर दारूची तस्करी करणाऱ्या चारचाकी वाहनाला अडवून सहा दारूविक्रेत्या आरोपींकडून वाहनासह एकूण नऊ लाख दोन हजार रूपयांचा दारूसाठा पकडल्याची कारवाई बुधवारी केली.
याप्रकरणी मुकेश दयाराम मुंगनकार (२३), भास्कर क्रिष्णा देशमुख (३४), तेजराम मनिराम बन्सोड (१८) तिघेही रा. सालेभट्टी ता. मानपूर जि. नांदगाव तसेच संजय दयाराम ठलाल (३५) रा. मुस्का ता. धानोरा, बुर्रा मलय्या, चिन्नू मलय्या दोघेही रा. डोंगरगाव ता. मानपूर जि. राजनांदगाव यांच्यावर आरमोरी पोलीस ठाण्यात मंबई दारूबंदी कायद्याचे कलम ६५ अ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
भास्कर देशमुख, मुकेश मुंगनकार, तेजराम बन्सोड, संजय ठलाल हे चौघेजण मुकेश मुंगनकार यांच्या सीजी-०८-डब्ल्यू-२४०७ या चारचाकी वाहनाने गडचिरोली जिल्ह्यात विदेशी दारूसाठा आणून ते किरकोळ दारूविक्रेत्यांना देणार आहेत, अशी गुप्त माहिती पथकाच्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पवार, ढवळे, उराडे, परिमल बाला, चवारे, छग्गीर, राठोड, साखरे, दुधलकर, पदा, मुंडे व तायडे यांनी वैरागड-कुरखेडा मार्गावर पाळत ठेवली. दरम्यान कुरखेडाकडून वैरागडकडे येणाऱ्या सीजी-०८-डब्ल्यू-२४०७ या वाहनाला अडविले व या वाहनाची तपासणी केली. या वाहनातून २ लाख ५२ हजार रूपये किमतीच्या इंटेरिअल ब्ल्यू कंपनीच्या विदेशी दारूचे २१ बॉक्स जप्त केले. तसेच ६ लाख ५० हजार रूपये किमतीचे चारचाकी वाहन जप्त केले. वाहनासह एकूण नऊ लाख दोन हजार रूपयांचा दारूसाठा पकडला.

विक्रमपुरातून आठ हजारांची मोहफूल दारू जप्त
चामोर्शी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर येथील मेघनाथ रवींद्र बिश्वास याच्या घरी धाड टाकून त्याचेकडून आठ हजार रूपये किमतीची एकूण ८० लिटर दारू जप्त केल्याची घटना मंगळवारी घडली. दारूविक्रेता आरोपी मेघनाथ बिश्वास याला अटक करून त्याचेवर मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये चामोर्शीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदर कारवाई ठाणेदार किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस हवालदार श्यामराव वडेट्टीवार, रेमाजी धुर्वे, नामदेव दुधे, संजय चक्कावार, चित्रा तोरे यांनी केली.

देसाईगंजात ५६ हजारांची दारू जप्त
दारूबंदी पथकाच्या पोलिसांनी मंगळवारी देसाईगंज शहरातील तुकूम वॉर्डात धाड टाकून दुचाकी वाहनासह एकूण ५६ हजार २०० रूपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी दारूविक्रेते आरोपी वामन सूर्यभान इंदुरकर (३८), शारदा देवानंद सहारे दोघेही रा. देसाईगंज यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. दारूचा पुरवठा करण्यासाठी दारूविक्रेत्यांनी वापरलेली एमएच-३३-एन-१६५७ ही दुचाकी जप्त केली.

Web Title: 9 lakhs of liquor was caught with the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.