९७ कोटींचे कर्ज वाटप
By Admin | Updated: August 7, 2016 01:36 IST2016-08-07T01:36:07+5:302016-08-07T01:36:07+5:30
विविध राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व सहकारी बँकांच्या वतीने चालू खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २२ हजार ९८ शेतकऱ्यांना

९७ कोटींचे कर्ज वाटप
उद्दिष्टाच्या ५१ टक्के : जिल्ह्यातील २२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ
गडचिरोली : विविध राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व सहकारी बँकांच्या वतीने चालू खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २२ हजार ९८ शेतकऱ्यांना ९६ कोटी ७३ लाख रूपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. यावर्षी खरीप हंगामात १८८ कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्टाच्या निम्मेच कर्ज वितरित झाले आहे.
वाढत्या महागाईबरोबरच तसेच शेतीतील अत्याधुनिक साधनांबरोबरच शेतीचा खर्च वाढत चालला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर धानाचे उत्पादन घेतले जाते. धानासाठी चांगले बियाणे, ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखणी आदी कामे केली जातात. त्याचबरोबर रासायनिक खते, कीटकनाशके यांचा खर्चही वाढला आहे. हा सर्व खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढल्याशिवाय पर्याय राहत नाही. कर्जासाठी शेतकरी सावकाराच्या दारात उभा होऊ नये, यासाठी मागेल त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या क्षेत्राप्रमाणे कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने बँकांना दिले आहेत. चालू खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकऱ्यांना १८८ कोटी १ लाख रूपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ९६ कोटी ७३ लाख रूपयांचेच कर्ज वितरण झाले आहे. बँकांना जेवढे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. त्याच्या निम्मेच कर्ज वितरण केले जाते. हा दरवर्षीचाच अनुभव आहे. याचाच कित्ता राष्ट्रीयकृत बँकांनी यावर्षीसुध्दा गिरविला आहे. काही बँकांनी उद्दिष्टाच्या २० टक्क्यांपेक्षाही कमी कर्जाचे वितरण केले आहे. (नगर प्रतिनिधी)
जनजागृतीसाठी मेळाव्यांमुळे शेतकऱ्यांना कर्जाची मिळाली माहिती
कर्जाबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या गावांमध्ये शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाच्या वतीने बँकांना दिले होते. त्यानुसार यावर्षी बँकांनी मोठ्या गावांमध्ये मेळाव्यांचे आयोजन केले. त्याचबरोबर महसूल विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यांमध्ये बँक कर्मचारी उपस्थित राहून त्यांना कर्ज घेण्याविषयी आवाहन करीत होते. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आघाडी
चालू खरीप हंगामात ९६ कोटी ६३ लाख रूपयांचे कर्ज वितरीत झाले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४३ कोटी २१ लाख रूपये कर्ज वितरित केले आहे. या बँकेला ५३ कोटी रूपयांचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्टाच्या ८२ टक्के कर्ज वितरित केले आहे. सर्वाधिक कर्ज वितरण याच बँकेतर्फे केले जाते. यावर्षीसुध्दा कर्ज वितरणात जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने आघाडी घेतली आहे. गतवर्षी सुध्दा या बँकेने जिल्ह्यात सर्वाधिक पीक कर्जाचे वाटप केले होते, हे विशेष.