९२ ग्रा. पं. ना कनेक्टिव्हिटी
By Admin | Updated: November 2, 2015 01:11 IST2015-11-02T01:11:41+5:302015-11-02T01:11:41+5:30
केंद्र शासनाने देशातील प्रत्येक ग्राम पंचायतीला इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

९२ ग्रा. पं. ना कनेक्टिव्हिटी
गडचिरोली : केंद्र शासनाने देशातील प्रत्येक ग्राम पंचायतीला इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात सहा पंचायत समितीमधील ९२ ग्राम पंचायतींपर्यंत केबल टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या ग्राम पंचायतींना लवकरच नेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.
सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले आहे. याअंतर्गतच ग्रामसभांना सर्वोच्च अधिकार बहाल करण्यात आले आहेत. अनेक ग्रामसभा गावाच्या हिताच्या दृष्टीने नियोजन करीत असल्याने गावांचा कायापालट झाला आहे. त्यामुळे आता ग्राम पंचायतीचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येणारे अनुदान थेट ग्राम पंचायतीच्या खात्यात जमा करण्याचे धोरणही शासनाने अवलंबिले आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे होते की नाही, त्याचबरोबर ग्रा. पं. चा कारभार गतिमान करण्यासाठी शासनाने देशभरातील सर्व ग्राम पंचायती नेट कनेक्टिव्हीटीने जोडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
देशातील सर्वच ग्राम पंचायती आॅप्टीकल फायबरने जोडण्यात येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सध्य:स्थितीत एकूण ४५७ ग्राम पंचायती आहेत. या सर्व ग्राम पंचायती आॅप्टीकल फायबरने जोडण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, गडचिरोली, कुरखेडा, मुलचेरा या तालुक्यांमधील ग्राम पंचायती जोडण्याचे काम सुरू झाले आहे. या सहा तालुक्यांमध्ये एकूण २४२ ग्राम पंचायती आहेत. यापैकी आरमोरी तालुक्यात ३१, चामोर्शी तालुक्यात ८२, देसाईगंज तालुक्यात १९, गडचिरोली तालुक्यात ५४, कुरखेडा तालुक्यातील ४५ व मुलचेरा तालुक्यातील ११ ग्राम पंचायती पहिल्या टप्प्यात जोडण्यात येणार आहेत. सहा तालुक्यातील २४२ ग्राम पंचायतींपैकी ९२ ग्राम पंचायतींपर्यंत केबल पोहोचविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम दोन ते तीन महिन्यात पूर्ण होणार आहे. १६८ किमी केबल टाकण्याचे काम पूर्ण होणार आहे. दुसरा टप्पा डिसेंबरनंतर सुरू होईल व जूनपर्यंत सर्व ग्राम पंचायतींना आॅप्टीकल केबलने जोडण्यात येणार आहेत. (नगर प्रतिनिधी)
ब्राँडबँडपेक्षा ५० पट अधिक स्पिड
ग्राम पंचायतीला इंटरनेट कनेक्टिव्हीटी देण्यासाठी आॅप्टीकल फायबरचा वापर केला जात आहे. आॅप्टीकल फायबरमध्ये काचाचा वापर केला जात असून त्यातून प्रकाश पाठविला जातो. दूरसंचारमधील हे अत्याधुनिक साधन आहे. सध्या वापरल्या जाणाऱ्या ब्राँडबँडसाठी कॉपर फायबरचा वापर केल्या जातो. या केबलची स्पिड केवळ दोन एमबीबीएस एवढी आहे. तर ग्राम पंचायतीसाठी वापरण्यात येत असलेल्या आॅप्टीकल फायबरची स्पिड १०० एमबीपीएस एवढी आहे.
कारभार गतिमान होण्यास मदत
प्रत्येक ग्राम पंचायत आॅनलाईन पद्धतीने जोडल्या गेल्यामुळे ग्राम पंचायतीच्या प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता येण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर ग्राम पंचायतीची माहिती राज्य व केंद्र शासनाला एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ग्राम पंचायतीची कार्यालयीन माहिती पाठविण्यासाठी कागदी घोडे नाचवावे लागत होते. यामध्ये बराच श्रम, पैसा, वेळ खर्च होत होता. कनेक्टिव्हीटीनंतर एका मिनिटात माहिती उपलब्ध होणार आहे.