८९,९६० बालकांना देणार पोलिओ डोज
By Admin | Updated: January 26, 2017 01:49 IST2017-01-26T01:49:56+5:302017-01-26T01:49:56+5:30
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पहिल्या टप्प्यात २९ जानेवारी रोजी रविवारला पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा आयोजित करण्यात आला आहे.

८९,९६० बालकांना देणार पोलिओ डोज
२ हजार ३०८ केंद्रांवर सुविधा : २९ जानेवारीला पहिल्या टप्प्यातील लसीकरण
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी पहिल्या टप्प्यात २९ जानेवारी रोजी रविवारला पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी शून्य ते पाच वर्ष वयोगटातील जिल्हाभरातील एकूण ८९ हजार ९६० बालकांना पल्स पोलिओचा डोज पाजण्यात येणार आहे. एकही मूल पल्स पोलिओच्या लसीकरणापासून वंचित राहू नये, याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागात एकूण २ हजार ३०८ केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आरोग्याची समस्या गंभीर झाली आहे. कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, सिकलसेल तथा इतर आजारांची समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्याची सुविधा पोहोचविण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. राज्य सरकारच्या निर्देशानुसार दरवर्षी पल्स पोलीओ मोहीम जिल्ह्यात राबविली जाते.
यावर्षी पहिल्या टप्प्यात २९ जानेवारीला तर दुसऱ्या टप्प्यात २ एप्रिल रोजी शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओ डोज देण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे संपूर्ण तयारी व व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी बुधवारी त्यांच्या कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. (स्थानिक प्रतिनिधी)
ग्रामीण भागात ८२ हजार बालके
पल्स पोलीओ मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात विशेष सुविधा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात २ हजार २४४ तर शहरी भागात ६४ असे एकूण २ हजार ३०८ केंद्रांची सुविधा लसीकरणासाठी करण्यात आली आहे. १७६ ट्राझिम टीम करण्यात आली असून ९५ मोबाईल टीमची व्यवस्था राहणार आहे. जिल्हाभरात शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एकूण ८९ हजार ९६० बालकांची संख्या आहे. यामध्ये ग्रामीण भागात ८२ हजार १३२ तर शहरी भागात ७ हजार ८२८ बालकांचा समावेश आहे.