जिल्ह्यात एकाच महिन्यात मलेरियाचे ८,०६५ रूग्ण

By Admin | Updated: December 9, 2014 22:49 IST2014-12-09T22:49:42+5:302014-12-09T22:49:42+5:30

२०१४ च्या जानेवारी ते आॅक्टोबरच्या अखेरपर्यंत दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात ८ हजार ५१६ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात मलेरियाची लागण अधिक

8656 patients of malaria in the district in the same month | जिल्ह्यात एकाच महिन्यात मलेरियाचे ८,०६५ रूग्ण

जिल्ह्यात एकाच महिन्यात मलेरियाचे ८,०६५ रूग्ण

गडचिरोली : २०१४ च्या जानेवारी ते आॅक्टोबरच्या अखेरपर्यंत दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात ८ हजार ५१६ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात मलेरियाची लागण अधिक असल्याचे निदर्शनास येत असून नोव्हेंबर या एकाच महिन्यात बाराही तालुक्यात एकुण ८ हजार ६५ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने जिल्ह्याला अद्यापही मलेरियाचा विळखा कायम असल्याचे दिसून येते.
मलेरियाच्या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागामार्फत जिल्हा, तालुकासह ग्रामीण व दुर्गम भागात विशेष शिबिर आयोजित करून तपासणी व औषधोपचार केला जात आहे. मात्र मलेरिया हा रोग झटपट बरा होणारा नसल्याने मलेरियाची साथ आटोक्यात येण्यासाठी पुन्हा काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात एकुण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तसेच ३०० हून अधिक उपकेंद्र आहेत. आरोग्य विभागाच्या सर्व संस्था व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत मलेरियाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अहेरी तालुक्यात १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आरोग्य विभागाच्यावतीने एकुण ७ हजार ११४ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. यामध्ये पीव्ही स्वरूपाचे ७७ व पीएफ स्वरूपाचे ४७३ असे एकुण ५५० मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आरमोरी तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात एकुण ४ हजार ४०६ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. यात पीव्ही स्वरूपाचे ९ व पीएफ स्वरूपाचे ७० असे एकुण ७९ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. एटापल्ली तालुक्यात एकुण ८ हजार ८६३ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. यात पीव्ही स्वरूपाचे १६८ व पीएफ स्वरूपाचे १ हजार ८८९ असे एकुण २ हजार ४७ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. भामरागड तालुक्यात एकुण ४ हजार ३६७ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. यात पीव्ही स्वरूपाचे ५४ व पीएफ स्वरूपाचे ७८१ असे एकुण ८३५ रूग्ण आढळून आले. चामोर्शी तालुक्यात एकुण ८ हजार ७७६ रक्त नमुने घेण्यात आले. यामध्ये पीव्ही स्वरूपाचे ५४ व पीएफ स्वरूपाचे ४१८ असे एकुण ४७२ मलेरिया पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. धानोरा तालुक्यात १९ हजार ८४३ रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही स्वरूपाचे १५१ व पीएफ स्वरूपाचे २ हजार २७३ असे एकुण २ हजार ४२४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. गडचिरोली तालुक्यात ७ हजार २५ रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही स्वरूपाचे २७ व पीएफ स्वरूपाचे १२३ असे एकुण १५० रूग्ण पॉझिटीव्ह आढळले. कोरची तालुक्यात एकुण ४ हजार ७७३ रक्त नमुने घेण्यात आले. यामध्ये पीव्ही स्वरूपाचे ४७ व पीएफ स्वरूपाचे ५११ असे एकुण ५५८ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. कुरखेडा तालुक्यात १० हजार ५५७ रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही स्वरूपाचे ४५ व पीएफ स्वरूपाचे ५२५ असे एकुण ५७० रूग्ण पॉझिटीव्ह आढळले. मुलचेरा तालुक्यात ३ हजार २०० रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही स्वरूपाचे २० व पीएफ स्वरूपाचे १३४ असे एकुण १५४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. सिरोंचा तालुक्यात ४ हजार ७२३ रक्त नमुन्यांमध्ये पीव्ही स्वरूपाचे ४६ व पीएफ स्वरूपाचे १६८ असे एकुण २१४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. देसाईगंज तालुक्यात २ हजार ९३६ नागरिकांचे रक्तनमुने घेण्यात आले. यामध्ये १२ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 8656 patients of malaria in the district in the same month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.