८५ ग्रामपंचायती केबलने जोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 01:45 IST2017-01-21T01:45:14+5:302017-01-21T01:45:14+5:30
भारत नेट अभियानांतर्गत गावांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

८५ ग्रामपंचायती केबलने जोडल्या
भारत नेट उपक्रम : लवकरच सुरू होणार इंटरनेट सेवा; गावांचा कायापालट होण्यास मदत
गडचिरोली : भारत नेट अभियानांतर्गत गावांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या योजनेंतर्गत पाच तालुक्यातील ८५ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबर केबलने (ओएफसी) जोडण्यात आल्या आहेत. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी या गावांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
केंद्र शासनाने विविध योजनांचा निधी सरळ ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात वळता करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक गाव इंटरनेटच्या जाळ्याने जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यासाठी भारत नेट हा उपक्रम सुरू केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, मुलचेरा, कुरखेडा, चामोर्शी या तालुक्यांमध्ये काम सुरू करण्यात आले आहे. गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीपैकी ९ ग्रामपंचायती आॅप्टीकल फायबरने जोडण्यात आल्या आहेत. देसाईगंज तालुक्यातील नऊ पैकी सात ग्रामपंचायती, मुलचेरा तालुक्यातील १७ पैकी चार ग्रामपंचायती, कुरखेडा तालुक्यातील ४५ पैकी २९ ग्रामपंचायती, चामोर्शी तालुक्यातील ७६ पैकी २४ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबर केबलने जोडण्यात आले आहेत. ज्या ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडल्या आहेत. तिथे ओएनटी ही एक मशीन लावण्यात येईल. त्याचबरोबर एक्सचेंज स्तरावर ओएलटी मशीन लावली जाणार आहे. या दोन्ही मशीन मार्चपूर्वी लावण्यात येईल. त्यामुळे या गावांमध्ये मार्चपूर्वी इंटरनेट सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास भारत संचार निगम लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (नगर प्रतिनिधी)
ज्या ग्रामपंचायतीमध्ये आॅप्टिकल फायबर पोहोचला आहे. त्या ठिकाणी ओएनटी व एक्सचेंज स्तरावर ओएलटी मशीन लावण्यात येतील. हे काम पुढील १५ ते २० दिवसांत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर या गावांमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यातील २४२ पैकी ज्या ग्रामपंचायतींचे काम शिल्लक राहिले आहे. तेथेही केबल टाकण्याचे काम वेगात सुरू आहे. मार्च महिन्यापूर्वी केबल टाकण्याचे काम पूर्ण होईल.
- इलियासुद्दीन सय्यद, जिल्हा अभियंता, बीएसएनएल
खासगी व्यक्तीलाही उपलब्ध होणार इंटरनेट सेवा
आॅप्टिकल फायबर केबलची क्षमता १० जीबीपीएस एवढी आहे. तर ब्रॉडबँडची क्षमता केवळ दोन एमबीपीएस एवढी आहे. म्हणजेच आॅप्टिकल फायबर केबलची क्षमता ब्रॉडबँडच्या तुलनेत हजारो पटीने अधिक आहे. त्यामुळे संबंधित गावातील गावकरी, दुकानदार, शासकीय कार्यालये, संस्था यांना इंटरनेटची सुविधा बिनाअडथळा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही गावे आता लवकरच आॅनलाईन होण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची नांदी येणार आहे.