८० टक्के नागरिकांकडे आधारकार्ड
By Admin | Updated: August 30, 2014 01:29 IST2014-08-30T01:29:49+5:302014-08-30T01:29:49+5:30
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत उपयोगी असलेला व सर्वसामान्य व्यक्तीची ओळख पटवून देणारा आधार कार्ड जिल्हातील सुमारे ८० टक्के...

८० टक्के नागरिकांकडे आधारकार्ड
गडचिरोली : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत उपयोगी असलेला व सर्वसामान्य व्यक्तीची ओळख पटवून देणारा आधार कार्ड जिल्हातील सुमारे ८० टक्के नागरिकांकडे असून आधार कार्ड काढण्याची मोहीम जिल्हाभरात सुरूच असल्याने उर्वरित नागरिकांनाही येत्या काही महिन्यातच आधार कार्ड मिळण्याची शक्यता आहे.
गडचिरोली जिल्ह्याची २०११ च्या लोकसंख्येनुसार सुमारे १० लाख ७१ हजार ७९५ एवढी लोकसंख्या आहे. आधार कार्ड काढण्याची पहिली मोहीम तीन वर्षापूर्वी हाती घेण्यात आली होती. मात्र आधार कार्डच्या विश्वसनीयतेबाबत काही तज्ञांकडून आक्षेप घेण्यात आल्याने आधार कार्ड काढण्याची मोहीम जवळपास १ वर्ष थांबली होती. आधार कार्ड काढण्याच्या पहिल्या टप्प्यात जिल्हाभरातील २ लाख ३० हजार ३२४ नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले. त्यानंतर आधार कार्ड काढण्याची मोहीम थांबल्याने आधार कार्ड निरूपयोगी झाले असल्याचीही शंका नागरिकांमध्ये उपस्थित व्हायला लागली होती.
आधार कार्डच्या विश्वसनीयतेबाबतच्या शंका दुर केल्यानंतर दुसरा टप्पा हाती घेण्यात आला. तेव्हापासून आधार कार्ड काढण्याची मोहीम सातत्याने सुरू आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने खासगी कंपन्या आधार कार्ड काढण्याचे कंत्राट घेण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे शासनाने स्वत: किट उपलब्ध करून दिल्या. व त्यांच्या मार्फतीने आधार कार्ड काढण्याचे काम आता सुरू आहे.
नक्षलग्रस्त भाग असल्याने आधार कार्ड काढण्याचे काम रोडावेल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र असे घडले नाही. मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे ६ लाख ११ हजार १६५ नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. पहिला व दुसरा टप्पा असे मिळून सुमारे ८ लाख ४१ हजार ४८९ नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. केवळ २० टक्के नागरिकांकडे आधार कार्ड नाहीत. आधार कार्ड काढण्याची मोहीम सुरूच असल्याने उर्वरित नागरिकांनाही काही दिवसांतच आधार कार्ड उपलब्ध होणार आहे.
आधार कार्ड काढते वेळी संबंधित व्यक्तीचे फोटो काढून त्याच्या दोन्ही हातांच्या दहाही बोटांचे ठसे घेतले जातात. नेत्र पटलही स्कॅन करून त्याची माहिती केंद्रीयकृत डेटाबेसमध्ये साठविली जाते व त्याला बारा आकडे असलेला एक क्रमांक दिला जातो. हा क्रमांक म्हणजेच आधार कार्ड होय. संबंधित क्रमांक टाकल्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटविली जाते. हे या आधार कार्डचे विशेष आहे. महत्वाचे म्हणजे आधार कार्डवर जात, धर्म, पंथ, भौगोलिक स्थान याबाबतचा उल्लेख नाही. तो केवळ भारताचा नागरिक आहे. एवढीच त्याची ओळख आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता कायम राहण्यास या आधार कार्डमुळे मदत होणार आहे. आधार कार्डचा उपयोग बँकेत खाते उघडतांना, वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी, गॅस सिलिंडर घेण्यासाठी, आश्रमशाळेतील प्रवेशासाठी यासारख्या असंख्य योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)