वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी ८० कोटींची तरतूद
By Admin | Updated: February 28, 2015 01:30 IST2015-02-28T01:30:33+5:302015-02-28T01:30:33+5:30
गुरूवारी सादर झालेल्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात गडचिरोली या मागास जिल्ह्याच्या वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी ८० कोटी रूपयाची तरतूद करण्यात आली आहे.

वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी ८० कोटींची तरतूद
गडचिरोली : गुरूवारी सादर झालेल्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात गडचिरोली या मागास जिल्ह्याच्या वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी ८० कोटी रूपयाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षात या रेल्वे मार्गाचे काम सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
मागील ३० वर्षांपासून वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचा प्रश्न रखडलेला आहे. ५० किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग करण्यासाठी मागील युपीए सरकारच्या काळात सर्वेक्षण काम पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणात ९ रेल्वे स्थानक निश्चित करण्यात आले. तसेच रेल्वे मार्ग जाणाऱ्या भागांचे सीमांकनही करण्यात आले होते. या रेल्वे मार्गाला येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. ४८० कोटी रूपये या मार्गासाठी गतवर्षी लागणार होते. मात्र आता या मार्गाचा प्रस्तावित खर्च वाढला असून ६६९ कोटी रूपये हा मार्ग पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात ८० कोटी रूपयाची तरतूद केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी केलेली आहे. यातील ४० कोटी रूपये केंद्र सरकार तर ४० कोटी रूपये राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे या वर्षात या रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल, अशी माहिती गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आपण निवडून आल्यापासून या रेल्वे मार्गाच्या कामासाठी नेटाने पाठपुरावा करीत आहो. अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न लावून धरला. त्यामुळे या मार्गासाठी ८० कोटीची तरतूद झाली. ४० कोटी रूपये राज्य सरकारच्या वाट्याचे देण्याचे मुख्यमंत्र्यांनी कबूल केले आहे, असेही खासदार नेते म्हणाले. याशिवाय नागपूर-नागभिड या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठीही ३८ कोटी रूपयाची तरतूद करण्यात आली आहे. हे दोनही कामे एकाचवेळी सुरू केले जातील. लवकरच रेल्वे मार्गाच्या कामासोबतच गडचिरोली जिल्ह्यात मंजूर झालेल्या चार राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमीपूजन केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू झालेल्या आहे, असे अशोक नेते यांनी स्पष्ट केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
उडाला गोंधळ, त्यामुळे विरोधकांची टिका
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना केवळ ४७ पानांचे वाचन केले. रेल्वेला नव्या दिशेने घेऊन जाणाऱ्या निर्णयांचा यात प्राधान्याने समावेश होता. त्यामुळे जुन्या रेल्वे प्रकल्पांसाठी केलेल्या निधीच्या तरतूदीचे वाचन त्यांनी सभागृहात बजेट सादर करताना केले नाही. त्यामुळे देशभरात प्रलंबित असलेल्या रेल्वे मार्गासाठी काहीच तरतूद झाली, असा संदेश लोकांमध्ये गेला व विरोधकांनी हिच बाब हेरून भाजपच्या खासदारांवर व सरकारवर जोरदार टिका केली. रेल्वेमंत्री राजकीय व्यक्तीमत्त्व नसल्याने त्यांना ही बाब महत्त्वाची वाटली नाही, असा सूर भाजपच्या वर्तुळात आता उमटला आहे.