आठ लाखांचे मोहफूल जप्त
By Admin | Updated: July 16, 2014 00:09 IST2014-07-16T00:09:26+5:302014-07-16T00:09:26+5:30
चामोर्शी तालुक्यातील वनव्यवस्थापन समित्यांकडून खरेदी केलेले मोहफूल दोन ट्रकद्वारे गडचिरोली-मुरूमगाव मार्गे छत्तीसगड राज्यात नेले जात होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी

आठ लाखांचे मोहफूल जप्त
छत्तीसगड राज्यात वाहतूक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील वनव्यवस्थापन समित्यांकडून खरेदी केलेले मोहफूल दोन ट्रकद्वारे गडचिरोली-मुरूमगाव मार्गे छत्तीसगड राज्यात नेले जात होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली शहरातील बसस्थानकासमोर मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दोन्ही ट्रक थांबवून चौकशी केली असता त्यात मोहफूल आढळून आले. सदर मोहफुलाची किंमत ८ लाख रूपये आहे.
चामोर्शी तालुक्यातील जामगिरी, गट्टाबाडी व राजगोपालपूर वनव्यवस्थापन समितीकडून ८२.८० क्विंटल मोहफूल खरेदी करून या मोहफुलाची सीजी ०८-एल १७३८ या क्रमांकाच्या वाहनाद्वारे वाहतूक केली जात होती. तर हळदी, राजूर, विसापूर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांकडून खरेदी केलेले ११४.८९ क्विंटल मोहफूल जीटी ०८ एल - १९९० क्रमांकच्या वाहनाने छत्तीसगड राज्यात नेले जात होते. याबद्दलची गुप्त माहिती गडचिरोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी गडचिरोली बसस्थानकासमोर सापळा रचून दोन्ही वाहने अडविली. दोन्ही वाहनांची चौकशी केली असता, त्यांच्यामध्ये मोहफूल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर वाहने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर उभे करण्यात आले. वाहनचालक मख्खनलाल शोभूराम मंगर (३०) रा. कालचुआ ता. मोहल्ला जि. राजनांदगाव व मंगूराम कालिराम रावत (२९) रा. नैतामटोला ता. अंबागड चौकी, जि. राजनांदगाव या दोघांची चौकशी केली असता, सदर माल छत्तीसगड राज्यातील अनिल गुप्ता नामक व्यापाऱ्याने खरेदी केले असल्याचे सांगितले.
संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांना मोहफूल विकण्याचा परवाना आहे. सदर परवाना वाहनचालकाने सादर केला. मात्र सदर माल छत्तीसगड राज्यात नेला जात होता. दुसऱ्या राज्यात मालाची वाहतूक करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र सदर परवानगी घेण्यात आली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई अधीक्षक सोनोने, दुय्यम निरिक्षक एस. यु. केवट, जी. पी. गजभिये, व्ही. पी. शेंद्रे यांच्या मार्गदर्शनात केली. (नगर प्रतिनिधी)