कारसह ८ लाख २० हजारांची दारू जप्त

By Admin | Updated: September 14, 2015 01:11 IST2015-09-14T01:11:31+5:302015-09-14T01:11:31+5:30

शेजारच्या गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात दारूची तस्करी करणाऱ्या कारचा आरमोरी पोलिसांनी पाठलाग करून मानापूर नजीक खोब्रागडी नदीजवळ कार पकडली.

8 lakh 20 thousand liquor seized with car | कारसह ८ लाख २० हजारांची दारू जप्त

कारसह ८ लाख २० हजारांची दारू जप्त

दोन दारूविक्रेते आरोपी फरार : आरमोरी पोलिसांची कारवाई
आरमोरी : शेजारच्या गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात दारूची तस्करी करणाऱ्या कारचा आरमोरी पोलिसांनी पाठलाग करून मानापूर नजीक खोब्रागडी नदीजवळ कार पकडली. या कारवाईत कारसह ८ लाख २० हजार रूपयांची अवैध दारू शनिवारी रात्रीच्या सुमारास जप्त केली. कारमधील दोन्ही दारूविक्रेत आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
आरमोरीचे ठाणेदार सुभाष ढवळे यांना गोंदिया जिल्ह्यातून देलनवाडी मार्गाने अवैध दारूची आयात होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदार ढवळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी वैरागडजवळ सापळा रचला.
यावेळी पोलिसांना एम. एच. १७ व्ही. ८९६९ क्रमांकाची कार येतांना दिसली. त्यांनी या कारला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र वाहनचालकाने पोलिसांना चकमा देत देलनवाडी- मानापूर मार्गावरून वाहन नेले. पोलिसांनी या कारचा पाठलाग केला. दरम्यान कारमधील अज्ञात आरोपींनी मानापूरजवळील खोब्रागडी नदीलगत कार उभी करून इसम फरार झाले. पोलिसांनी कारची तपासणी करून कारमधून ४ लाख २० हजार रूपये किमतीच्या देशी दारूच्या ७ हजार ४१६ निपा जप्त केल्या. जप्त केलेल्या कारची किंमत ४ लाख रूपये आहे.
या घटनेसंदर्भात आरमोरी पोलिसांनी दोन्ही अज्ञात आरोपींविरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीच्या मागावर पोलीस आहेत. सदर कारवाई आरमोरीचे ठाणेदार सुभाष ढवळे, पोलीस उपनिरीक्षक पंकज दाभाडे, पोलीस हवालदार गोकुल मेश्राम, नंदेश्वर पुण्यप्रेडीवार, भैसारे यांनी केली.
आरमोरी पोलिसांच्या या कारवाईमुळे आरमोरी तालुक्यातील अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 8 lakh 20 thousand liquor seized with car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.