आठ कोटीतून गडचिरोलीत इनडोअर स्टेडियम होणार
By Admin | Updated: January 10, 2016 01:35 IST2016-01-10T01:35:58+5:302016-01-10T01:35:58+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये संधी मिळावी म्हणून गडचिरोली येथे आठ कोटी ...

आठ कोटीतून गडचिरोलीत इनडोअर स्टेडियम होणार
पालकमंत्र्यांची घोषणा : एटापल्ली येथे तालुका क्रीडा व बाल सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन
एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये संधी मिळावी म्हणून गडचिरोली येथे आठ कोटी रूपये खर्च करून इनडोअर स्टेडियम बांधण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकलव्य स्पोर्टस् अकॅडमी स्थापन करून नामांकित खेळाडूद्वारे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
शनिवारी एटापल्ली तालुका क्रीडा व बाल सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते मशालीच्या साहाय्याने क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.चे सभापती दीपक फुलसंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.चे उपसभापती संजय चरडुके, पं.स. सदस्य केशव पुडो, तहसीलदार संपत खलाटे, नगराध्यक्ष सरिता राजकोंडावार, नगरसेवक विजय नल्लावार, तात्या दुर्वा, दीपक सोनटक्के, सल्लागार समितीचे सदस्य मनोहर हिचामी, गट विकास अधिकारी पी. व्ही. लुटे, गट शिक्षणाधिकारी एन. डी. माटुरकर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री आत्राम यांनी एटापल्लीसह जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यात क्रीडा संकुल नाही, तेथे क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे, असे सांगितले.
यावेळी सांगितले. कस्तुरबा गांधी कन्या शाळा, समूह निवासी शाळा व तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांसमोर नृत्य सादर केले. विविध संघटनांच्या वतीने पालकमंत्र्यांचे स्वागत याप्रसंगी करण्यात आले. संचालन केंद्र प्रमुख राजू वडपल्लीवार यांनी तर प्रास्ताविक संवर्ग विकास अधिकारी लुटे यांनी केले.
२ वाजता होणारा नियोजित उद्घाटन सोहळा पालकमंत्री तीन तास उशीरा पोहोचल्याने ५ वाजता सुरू करण्यात आला. तोपर्यंत विद्यार्थ्यांसह मान्यवरांनाही पालकमंत्र्यांची प्रतीक्षा करावी लागली. (तालुका प्रतिनिधी)