निराधार योजनेचे ८९ प्रकरणे मंजूर
By Admin | Updated: April 7, 2016 01:32 IST2016-04-07T01:32:37+5:302016-04-07T01:32:37+5:30
जिल्ह्यात शासनाच्या वतीने विविध निराधार योजनेंतर्गत नागरिकांना वैयक्तिक लाभ देऊन आर्थिकदृष्ट्या मदत केली जात आहे.

निराधार योजनेचे ८९ प्रकरणे मंजूर
५६ प्रकरणे नामंजूर : आरमोरी तहसील कार्यालयात बैठक
आरमोरी : जिल्ह्यात शासनाच्या वतीने विविध निराधार योजनेंतर्गत नागरिकांना वैयक्तिक लाभ देऊन आर्थिकदृष्ट्या मदत केली जात आहे. आरमोरीचे तहसीलदार एम. टी. वलथरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात शनिवारी झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन व अपंग निवृत्तीवेतन आदी योजनांचे एकूण ८९ प्रकरणे मंजूर करण्यात आले.
बीपीएल, नॉन बीपीएलसाठी असलेल्या वरील पाचही निराधार अनुदान योजनेचे एकूण २६६ प्रस्ताव तहसील कार्यालयाला प्राप्त झाले. यापैकी ८९ प्रकरणे मंजूर करण्यात आले असून ५६ प्रकरणे नामंजूर करण्यात आले आहे. अनेक त्रुट्या आढळल्यामुळे १२१ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आले आहे. मंजूर करण्यात आलेल्या ८९ प्रकरणांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे २४, श्रावण बाळ निवृत्तीवेतन (बीपीएल) योजनेचे २१, श्रावण बाळ (नॉन बीपीएल) योजनेचे ३६, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन (बीपीएल) ६ व इंदिरा गांधी अपंग निवृत्तीवेतन योजनेच्या २ प्रकरणांचा समावेश आहे. यावेळी बैठकीला नायब तहसीलदार डी. एस. नैताम तसेच हेमलता मसराम, विश्रांती बागडे, प्रशांत लांडगे, मनोज डहारे हजर होते.